नव तंत्रज्ञानाने नारळ, सुपारीच्या बागा व आंबा, काजूच्या पुनर्लागवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -पालकमंत्री कु.आदिती तटकरे



अलिबाग,जि.रायगड, दि.29 (जिमाका) : निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील किनारपट्टीच्या सर्व भागांना तडाखा बसून मोठया प्रमाणावर नारळ, सुपारीच्या बागांचे, आंबा, काजूच्या झाडांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नव तंत्रज्ञानाने जिल्ह्यातील नारळ, सुपारीच्या बागा व आंबा, काजूच्या पुनर्लागवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज श्रीवर्धन येथे केले.
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नारळ, सुपारी फळबागांची पुनर्लागवड तसेच त्या संबंधीचे नवीन तंत्रज्ञान व शासकीय योजना याबाबतची बैठक उपविभागीय कार्यालय, श्रीवर्धन येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीसाठी खासदार सुनिल तटकरे, कृषी, पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, श्रीवर्धन नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, दर्शन विचारे, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती प्रगती अदावडे, पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, उपसंचालक फलोत्पादन, कृषी आयुक्तालय, पुणे श्री.एस.व्ही.भालेकर, संचालक, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, एस.बी.भगत, प्रांताधिकारी अमित शेडगे,  जिल्हा कृषी अधीक्षक पांडूरंग शेळके,  जि.प. कृषी विकास अधिकारी श्री.खुरकुटे, तहसिलदार सचिन गोसावी, तालुका कृषी अधिकारी श्री.भांडवलकर, श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्राचे श्री.एस.आर.महाळदार, कृषी उपसंचालक कार्यालयाचे एस.ए.कोलते, श्रीवर्धन बागायतदार संघाचे अध्यक्ष उदय बापट, इतर बागायतदार हे उपस्थित होते.
पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणाल्या, चक्रीवादळामध्ये सर्वाधिक नुकसान श्रीवर्धन तालुक्यात झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर, आदगाव त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील खुजारे, नागलोली, कारले या ठिकाणी असलेल्या नारळ, सुपारीच्या वाड्या पूर्णपणे उध्वस्त झाल्या. वादळात ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना शासकीय मदत वाटप सुरू झाले आहे. प्रत्येक नागरिकाच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ज्या बागायतदारांची नारळ व सुपारीची रोपे पूर्णपणे पडली आहेत, अशा बागायतदारांच्या घरी जाऊन कृषी सहाय्यक झाडांची मोजणी करतील व या झाडांच्या मोजणीप्रमाणे त्यांना वाढीव मदत देण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करीत आहे.
पालकमंत्री या नात्याने संपूर्ण जिल्ह्याचा आढावा व ॲक्‍शन प्लॅन तयार करण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे सांगून कु.आदिती तटकरे म्हणाल्या, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी येत्या आठ दिवसांमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये किती नुकसान झाले आहे व बागायतदारांना किती रोपे नवीन लावण्यासाठी लागणार आहेत, याबाबत संपूर्ण माहिती तयार करणार आहेत. शासनाकडून लागवडीसाठी नवीन रोपे, त्याचप्रमाणे खड्डे खणण्यासाठी निधी, कुंपण या सर्वांसाठी बागायतदारांना अनुदान मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील नारळ सुपारीच्या त्याचप्रमाणे आंबा-काजूच्या बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
 यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन या ठिकाणी असल्याने ही बैठक येथे आयोजित करण्यात आली आहे, सुपारीची जास्तीत जास्त रोपे तयार करावी लागणार आहेत आणि ती सुद्धा श्रीवर्धनची रोठा सुपारी असावी, त्याचप्रमाणे केळी, अननस, जायफळ, कोकम,गरम मसाल्याची लागवड करता येईल व ही आंतरपिके असतील,असे सांगितले.
या बैठकीनंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे व खा. सुनील तटकरे यांनी येथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने तहसिलदार श्री.गोसावी यांना आतापर्यंत करण्यात आलेले पंचनामे पुन्हा पडताळून पाहण्याच्या सूचना केल्या. तसेच गोंडघर स्विचींग स्टेशन सुरू करण्यात आले असल्याने बोर्ली पंचतन परिसरातील वीजपुरवठा लवकरच सुरू होईल, असेही सांगितले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक