उप प्रादेशिक परिवह कार्यालय, पेण येथे वाहन विषयक व लायसन्स विषयक सर्व कामे सुरु




अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका)-करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी परिवहन कार्यालयातील गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनमुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथील वाहन व लायसन्स  विषयक कामकाज  स्थगित करण्यात आले होते. 
            उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दि.18 मे 2020 पासून नवीन नोंदणी विषयक तर दि01 जून 2020 पासून परिवहन वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देणे व नुतनीकरण करण्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. तसेच दि.18 जून 2020 पासून शिबीर कार्यालयातील कामे वगळता उर्वरित सर्व कामे जसे अनुज्ञप्ती जारी करणे, दुय्यम अनुज्ञप्ती देणे, अनुज्ञप्ती नुतनीकरण, पत्ता बदल, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे व वायुवेग पथक कामकाज सुरु करण्यात येत आहेत.
            या सर्व कामकाजाकरिता आगाऊ वेळ निर्धारण प्रणालीवर (अपॉईटमेंट प्रणालीवर) निर्धारित करणे आवश्यक राहील. शिकाऊ अनुज्ञप्ती व ड्रायव्हींग टेस्टसाठी येणाऱ्या अर्जदारांनी मास्क व हँडग्लोव्हज घातलेले असतील तरच अर्जदारांना कार्यालयात प्रवेश देण्यात येईल.  योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण केले असेल तरच योग्यता प्रमाणपत्र विषयक चाचणी घेण्यात येईल.
            उप प्रादेशिक परिवह कार्यालय, पेण येथे वाहन विषयक व लायसन्स विषयक सर्व कामे सुरु करण्यात आली असून, नेमून दिलेल्या कोट्याप्रमाणे अपॉईटमेंट घेतली असेल व त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे कार्यालयात सादर केल्यानंतर कामकाज करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,पेण श्रीमती उर्मिला पवार यांनी कळविले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक