गोंधळपाडा येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु


वृत्त क्रमांक :- 779                                                      दिनांक :- 23 जून 2020



अलिबाग,जि.रायगड, दि.23 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह गोंधळपाडा, अलिबाग येथे कार्यरत आहे.  या वसतिगृहामध्ये इयत्ता आठवी पासून गरीब, हुशार होतकरू मागासवर्गीय अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती पाच टक्के, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के, अनाथ 2 टक्के, अपंग 3 टक्के यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.
 या वसतिगृहात विद्यार्थ्यांकरीता मोफत निवास व्यवस्था असून नाश्ता, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ, दूध तसेच भोजनामध्ये डाळ-भात, चपाती,भाजी/उसळ, लोणचे, पापड इत्यादीसह आठवड्यातून दोन वेळा मांसाहार देण्यात येतो.  अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील पुरविले जाते.  दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ता दिला जातो. शालेय व गणवेश पात्र विद्यार्थिनींना दोन संचाकरिता गणवेश भत्ता, रेनकोट, छत्री भत्ता दिला जातो.  याव्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रीडा साहित्य, मनोरंजन साहित्य इत्यादी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
प्रवेशपात्र विद्यार्थीनींच्या पालकांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थीनींकरिता रुपये 2 लाख 50 हजार च्या आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थीनींकरिता रुपये एक लाखाच्या आत असावे.  ऑनलाइन प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीची सन 2020-21 मधील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत, जातीच्या मुलकी अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत, मागील इयत्ता पास झाल्याच्या गुणपत्रकाची सत्यप्रत, आधारकार्डची सत्यप्रत, शाळा-कॉलेजचे बोनाफाईड या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे.
सन 2020-21 शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे ऑफलाइन फॉर्म भरण्याकरिता तसेच या वसतिगृहाच्या अधिक माहितीकरिता गृहपाल, यू.एस. गुजेला यांच्याशी कार्यालयीन वेळेत वरील पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांक 9545390255 यावर संपर्क साधावा, असे आवाहन या वसतिगृहाचे गृहपाल यू.एस. गुजेला यांनी केले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक