निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान भरपाईबाबत एनडीआरएफच्या निकषात बदल करून मदत करावी कु. तटकरे यांची केंद्रीय पथकाकडे मागणी




                अलिबाग,जि.रायगड, दि.17 (जिमाका) : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणत मदतीची अपेक्षा आहे.  केंद्र शासनाने एनडीआरएफ  निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करावी, अशी मागणी उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, विधी व न्याय राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी केंद्रीय पथकाचे अध्यक्ष श्री.रमेश कुमार जी (सह सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) यांना निवेदनाद्वारे केली. 
            रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्र शासनाचे आंतर मंत्रालयीन पथक काल पासून तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आले आहे. काल आदिती तटकरे यांनी पथकाची भेट घेवून रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
            चक्रीवादळामुळे झालेले नुकसान हे मोठे असून नुकसानग्रस्तांचे झालेल्या नुकसानीनुसार पंचनामे सुरू आहेत अशी मागणी देखील केंद्रीय पथकाला केली आहे. 
            कु.तटकरे म्हणाल्या, 1891 नंतरचे सर्वात मोठे असे चक्रीवादळ दि. 3 जून 2020 रोजी झाले आहे. फयान, सायक्लॉन वादळाचा मुंबईवर मोठा परिणाम झाला होता. एनडीआरएफ व एसडीआरएफची सध्याचे निकष निसर्ग सारख्या चक्रीवादळाला पुरक नाहीत. केंद्र शासनाकडून नुकसानग्रस्तांना देण्यात येणारी भरपाई ही सध्याच्या निकषानुसार अपुरी आहे.
            करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घरगुती पर्यटन ही संकल्पना पुर्णत: डबघाईस आली आहे. कोकणातील घराजवळील परस बागेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या परस बागेसाठी विशेष मदतीचे पॅकेजही केंद्र शासनाने जाहीर करणे आवश्यक आहे.
            भविष्यात निसर्ग सारखे चक्रीवादळ पुन्हा आल्यास विस्थापित लोकांसाठी कायमस्वरूपी निवारा घरे ही काळाची गरज आहे. म्हणून निकषात बदल करून अंतर्गत  निवारा गृहांच्या बांधकामांना मंजुरी देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी केंद्रीय पथकामध्ये सहसचिव (प्रशासन व सीबीटी), एनडीएमच, एमएचए, नवी दिल्ली श्री.रमेशकुमार गंटा (भाप्रसे), सल्लागार अर्थ मंत्रालय (खर्च), नवी दिल्ली श्री.आर.बी.कौल, संचालक, उर्जा मंत्रालय, सीईए, नवी दिल्ली श्री.एल.आर.एल.के.प्रसाद, उपसचिव, ग्रामीण विकास, नवी दिल्ली श्री.एस.एस.मोदी, संचालक, कृषी मंत्रालय, नागपूर श्री.आर.पी.सिंग, मुख्य अभियंता, क्षेत्रीय कार्यालय, रस्ते वाहतूक व महामार्ग, मुंबई अंशुमली श्रीवास्तव हे उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक