कोकण विभागात रासायनिक खताचा पुरेसा साठा उपलब्ध - श्री. विकास पाटील




अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- चालू खरीप हंगामात कोकण विभागात- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुख्यत: भात व फळपिकांचे क्षेत्र असून खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या कृषी निविष्ठा, त्यामध्ये बियाणे व रासायनिक खतांची उपलब्धता सर्व जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली आहे. कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर त्यांच्या मागणीनुसार जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत युरिया खताची मागणी 31 हजार 430 मे. टन एवढी होती त्यानुसार 33 हजार 858 मे. टन युरियाची उपलब्धता झाली आहे. म्हणजेच मंजूरीपेक्षा 108 % उपलब्धता झाली असून ती शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच करण्यात आलेली आहे. भात पिकाचे बियाणे 5 एप्रिल पासूनच उपलब्ध होऊन शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केलेल्या आहेत. माहे जून मध्ये पुरेसा पाऊस झाल्याने रोपांची उगवण चांगली होऊन लागण सुरु झालेली आहे. त्याकरिता लागणारा रासायनिक खताचा साठा कृषी निविष्ठा केंद्रावर उपलब्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा करण्यात आला आहे.   
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आर.सी.एफ. कंपनीच्या खताची रेक पोहोचविण्यात आली. लॉकडाऊनमुळे रेक खाली करण्याकरिता मजूरांचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने त्यावर मार्ग काढून खताचा पुरवठा सुरळीत करण्यात आला.
कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व निविष्ठा केंद्रांची विशेष तपासणी मोहीम घेऊन सर्व विक्री केंद्रे तपासण्यात आली. विक्री केंद्रामध्ये दर फलक लावणे, मागेल त्याप्रमाणे निविष्ठा देणे व सर्व नोंदी व्यवस्थित ठेवण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही विक्रेत्याने जादा दराने खते, बियाणे विकलेले आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाही करण्यात येईल, अशा सूचना सर्व विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.
कोकण विभागात, मुख्यत: युरिया, डी.ए.पी. व नत्रयुक्त मिश्र खते जिल्ह्याच्या मागणीनुसार व कृषी आयुक्तालयाने मंजूर केल्याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. कोकण विभागात शेतकऱ्यांना बांधावर बियाणे व खते पुरवठा योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 200 शेतकरी गटामार्फत 4 हजार 750 मे. टन आणि 8 हजार 432 क्विंटल बियाणे बांधावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच पालघर जिल्ह्यात 1 हजार 245  शेतकरी गटामार्फत 6 हजार 196 मे. टन खते आणि 10 हजार 945 क्विंटल बियाणे पुरवठा केली आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये 2 हजार 807 शेतकरी गटांमार्फत 11 हजार 898 मे. टन खते आणि 8 हजार 560 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यात 2 हजार 376 शेतकरी गटांमार्फत 1 हजार 346 मे. टन खत आणि 2 हजार 210 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 हजार 918 शेतकरी गटांमार्फत 1 हजार 371 मे. टन खते आणि 5 हजार 861 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.   
अशा प्रकारे कोकण विभागात एकूण 9 हजार 546 शेतकरी गटांमार्फत 25 हजार 561 मे. टन खते आणि 36 हजार 008 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध  करून देण्यात आलेली आहेत.
कोकण विभागात जिल्हास्तर व तालुका स्तरावर भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली असून त्यांच्याद्वारे निविष्ठा विक्रीच्या काळ्या बाजारावर अंकुश ठेवला जात आहे. त्यामुळे कोकण विभागात आतापर्यंत बियाणे उगवणीबाबत तक्रारी आलेल्या नाहीत, अशी माहिती श्री. विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे यांनी दिली. 
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक