रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची ऑनलाईन प्रतिक्षा यादी तयार करण्याची प्रक्रिया पारदर्शकच



अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- गेल्या काही दिवसांपासून जिल्हयातील काही वृत्तपत्रांमध्ये तसेच सोशल मिडियावर भरती प्रक्रियेत दलालांनी परस्पर पैसे घेवून उमेदवारांची फसवणूक झाल्याबाबत बातम्या प्रसारित झाल्या आहेत. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ श्री.आनंद भोसले यांच्याकडून वस्तूस्थितीदर्शक माहिती देण्यात आली आहे.
श्री.भोसले यांनी स्पष्ट केले आहे की, ही कोणतीही सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया नाही तर प्रतिक्षा यादी तयार करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध आस्थापनांकडून जशी मागणी होईल तसे सुरक्षा रक्षकांचा पुरवठा संबंधित आस्थापनांना करण्यात येणार आहे. कोणत्याही सुरक्षा रक्षकाला मंडळात काम देण्यात येणार नाही. त्यामुळे ही भरती प्रक्रिया नाही. 
त्यांनी पुढे म्हटले आहे की, रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळास सुरक्षा रक्षकांची प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी मंडळाने मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने नियुक्त केलेल्या मे. सेराईज टेक सोल्युशन्स प्रा. लि. या संस्थेमार्फत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन व स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करुन मार्च 2019 मध्ये सुरक्षा रक्षकांची नोंदणी प्रक्रिया सुरु केली होती. ही ऑनलाईन प्रक्रिया प्रथमच करण्यात आलेली आहे. जाहिराती मध्ये नमूद केल्यानुसार सर्व उमेदवारांनी www.sgbregistration.in या संकेतस्थळावर अर्ज सादर केले आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, मैदानी व शारीरिक चाचणी यांचे संदेश थेट उमेदवारांच्या भ्रमणध्वनीवर ऑनलाईन एजन्सी मे. सेराईज टेक सोल्युशन्स प्रा. लि. यांनी पाठविलेले आहेत. उमेदवारांनी पोलीस परेड मैदान, रोडपाली नवी मुंबई येथे दिलेली शारीरिक चाचणी व मैदानी परीक्षा ही प्रक्रिया जिल्हा क्रिडा अधिकारी या कार्यालयामार्फत पार पाडलेली आहे, यांच्या गुणांकनपत्रिकेवर स्वत: उमेदवारांची देखील स्वाक्षरी आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पाडलेली आहे. या ठिकाणी कुठेही रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा कोणताही हस्तक्षेप झालेला नाही. 
नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत असताना उमेदवारांनी दलालांशी संपर्क केल्यास व त्यांची फसवणूक झाल्यास रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कुठल्याही प्रकारे जबाबदार असणार नाही, असे आवाहन मंडळाने पोस्टरद्वारे व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये व फेसबुक, व्हॉटसअॅप या माध्यमांतून वेळोवेळी जाहीर केलेले आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली असून पात्र उमेदवारांना चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करणेबाबत उमेदवारांच्या भ्रमणध्वनीवर संदेश मे. सेराईज टेक सोल्यशन या संस्थेमार्फतच पाठविण्यात येत आहेत, आणि त्यानुसार बऱ्याच उमेदवारांनी चारित्र्य पडताळणी दाखले व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करत असल्याचे ऑनलाईन दिसतही आहे. ज्या उमेदवारांचे पूर्ण कागदपत्र ऑनलाईन सादर झाले आहेत, अशा उमेदवारांना ऑनलाईनच नोंदणी क्रमांक दिला जात आहे. ज्या उमेदवारांना नोंदणी क्रमांक मिळालेला आहे अशा उमेदवारांना त्यांच्या अधिवासाप्रमाणे आस्थापनेकडून जशी मागणी असेल त्यानुसार नियुक्ती दिली जाणार आहे. तसा संदेश उमेदवारास त्यांच्या भ्रमणध्वनीवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
अशा प्रकारे ही सर्व प्रक्रिया मे. सेराईज टेक सोल्युशन्स प्रा. लि. या संस्थेमार्फत पारदर्शकपणे केली जात आहे, असे असतानाही काही वृत्तपत्रामध्ये तसेच सोशल मिडियावर उमेदवारांची फसवणूक होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत.  याबाबत मंडळाकडून सर्व उमेदवारांना ही प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन आहे, आपण कोणत्याही दलालाशी संपर्क करु नये व स्वत:ची फसवणूक करुन घेवू नये. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मंडळाचा कोणताही हस्तक्षेप नाही.  त्यामुळे उमेदवारांची आर्थिक देवाण-घेवाण मध्ये फसवणूक झाल्यास रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ जबाबदार राहणार नाही, असे सूचित करण्यात आले असून याबाबत उमेदवारांची फसवणूक करणाऱ्याविरोधात संबंधित पोलीस स्टेशनला पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ आनंद ध. भोसले यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक