निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा



                अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका):- निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण विभागातील जिल्ह्यात प्रामुख्याने फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंबा, काजू, नारळ, चिकू, कोकम, सुपारी झाडे पूर्णपणे उन्मळून पडल्याने बागायतदारांचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे नष्ट झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना फळबाग पुनर्लागवडीसाठी व पुनरुज्जीवनासाठी रोजगार हमी योजनेमधून शासकीय अनुदान देणे, हा लोकोपयोगी निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता 50 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
    या योजनेकरिता लाभार्थीची निवड पुढीलप्रमाणे :- 
                वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास फळबाग नुकसानग्रस्त शेतकरी पात्र राहील. यामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी या बागांचे नुकसान झालेल्या संयुक्त पंचनाम्यामध्ये समाविष्ट असलेले, नगरपालिका क्षेत्र व ग्रामीण भागातील लाभार्थी, ज्या फळबागा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत त्यामधील सर्व झाडे, अस्तित्वात असलेल्या बागांमधील काही झाडे नष्ट झाली असल्यास नष्ट झालेल्या झाडांच्या संख्येइतकी झाडे पुनर्लागवडीसाठी पात्र आहेत.  यामध्ये आंबा पिकासाठी शेतकरी सघन लागवडीसाठी पात्र राहील, ज्या झाडांच्या फांद्या तुटून नुकसान झाले आहे, ते शेतकरी त्या झाडांच्या संख्येइतक्या झाडांकरिता पुनरुज्जीवनासाठी पात्र राहतील. योजनेत सहभाग घेण्यासाठी संयुक्त पंचनाम्यामध्ये शेतकऱ्याचे नाव समाविष्ट असणे आवश्यक राहील.
       फळझाड पुनर्लागवड व पुनरुज्जीवनाकरिता प्रति फळझाडनिहाय देय अनुदान पुढीलप्रमाणे :- 
                  आंबा कलमे अनुक्रमे रु.507 व रु.454, आंबा घन लागवड अनुक्रमे रु. 248 व रु 224, काजू कलमे अनुक्रमे रु.281 व रु .256, नारळ (बाणवली) अनुक्रमे रु.392 व रु .365, नारळ (टी x डी) अनुक्रमे रु.428व रु.395, चिकू अनुक्रमे रु.501 व रु.455, सुपारी अनुक्रमे रु.109 व रु .101, कोकम अनुक्रमे रु.281 व रु.256.
                   निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण विभागातील एकूण बाधित क्षेत्र 17 हजार 574.82 हेक्टर असून शेतकरी संख्या 76 हजार 603 आहे. कोविड-19 या महामारीमुळे देशात व राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर निसर्ग चक्रीवादळामुळे फळबागांचे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना/ बागायतदारांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना सन 2020-21 लाभदायक आहे.
                  कोकण विभागातील निसर्ग चक्रीवादळामुळे फळझाडांचे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने  शेतकरी बंधूंनी आपल्या नजिकच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना सन 2020-21 या योजनेचा लाभ मिळण्याकरिता योजनेत मोठया प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग विकास पाटील यांनी केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक