शेतकरी उत्पादक संस्था स्थापित करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढे यावे - जिल्हाधिकारी निधी चौधरी


अलिबाग, जि.रायगड, दि.6 (जिमाका)- शेतकऱ्यांनी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी नाबार्ड अंतर्गत जिल्ह्यात शेतकरी उत्पादक संस्था (फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी) स्थापित करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज येथे केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात नाबार्डची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

 यावेळी नार्बाडचे व्यवस्थापक श्री.राघवन, स्टेट बँक मॅनेजर श्री.निंबेकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष मस्के, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, जिल्‍हा उपनिबंधक गोपाळ मावळे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सुरेश भारती, आत्मा चे उपसंचालक सतिश बोराडे उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी निधी चौधरी पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत विविध लाभ मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाकडे अर्ज सादर करावेत. बँकाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास नाबार्ड, जिल्हा अग्रणी बँक, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय आणि कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. जिल्ह्यात फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्या स्थापित व्हाव्यात, त्याचा प्रचार व प्रसार व्हावा, याकरिता अधिकाधिक प्रयत्न करण्यात यावेत.

या बैठकीत श्रीवर्धन येथे आंबा, म्हसळा येथे काजू या पिकासंबंधी तर महाड येथे दूध प्रक्रिया किंवा कुक्कुटपालन, उत्पादन व विक्री यासंबंधी फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्या सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निश्चित करण्यात आले. नाबार्डतर्फे एका फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला तीन वर्षांसाठी एकूण 18 लाख रुपये भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सन 2019 ते 2024 या कालावधीसाठी व त्यापुढे सन 2027-2028 या कालावधीपर्यंत केंद्र शासनातर्फे संपूर्ण देशात 10 हजार नवीन शेतकरी उत्पादक संस्थांची (फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी) निर्मिती करून शेतकरी उत्पादक संस्थांची स्थापना व प्रचार ही नवीन योजना राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.  

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक