मुरुड, आगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नांचे फलित

 


 

अलिबाग,जि.रायगड, दि.19  (जिमाका):-  रायगड जिल्ह्यात मुरूड, आगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी प्रस्ताव तयार करावा; तसेच सध्या उपलब्ध जेट्टींची पाहणी करून योग्य ठिकाणी मत्स्यव्यवसायासंबंधी सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.

              रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील आगरदांडा प्रवासी जेट्टीवर मासेविक्री करण्याबाबत आणि खोराबंदर येथे तात्पुरती जेट्टी बांधकामाबाबत श्री. भरणे यांच्याकडे पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांनी पाठपुरावा केला होता. या  पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे आवश्यक त्या सूचना दिल्या.

             यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी तसेच मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

            सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करून आणल्यानंतर मासे विक्रीसाठी तसेच मत्स्यप्रक्रियेसाठी ससून डॉक येथे जाता येत नाही. त्यामुळे मच्छीमारांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने पर्यायी व्यवस्था व्हावी अशी मागणी मच्छीमार संघटनांनी राज्यमंत्री कु.आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

            करोना प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सोशल डिस्टंन्सिंग आणि स्वच्छता राखणे महत्वाचे असल्याने आगरदांडा प्रवासी जेट्टीवर मासे उतरविण्यास आणि विक्रीस परवानगी देण्यात मच्छीमारांच्या आणि नागरिकांच्याही आरोग्यास धोका संभवतो. त्याऐवजी मुरुड, आगरदांडा परिसरात सोयीस्कर जागी कायमस्वरूपी जेट्टी उभारणीचा प्रस्ताव  दीर्घ  काळानुसार उपयुक्त ठरू शकतो, याशिवाय मत्स्यव्यवसाय आणि मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरा करून कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी जागा निश्चित करून तसा प्रस्ताव पाठवावा, तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या जेट्टींची पाहणी करून तेथे मासे उतरविण्याची, विक्री करण्याची तसेच त्यानुषंगाने अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन  करण्याचे निश्चित झाले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक