‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 329 कुटुंबांची पाहणी-पालकमंत्री कु.आदिती तटकरे

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.25 (जिमाका) :-  रायगड जिल्ह्यात  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा समन्वयाने काम करीत असून आतापर्यंत या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 329 कुटुंबांची पाहणी पूर्ण झाली असून लवकरच या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेबाबत कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे आढावा घेतला.  त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे  उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करताना काही अडचण असल्यास करोना टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी. ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे. प्रचार प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत, करोना दक्षता समित्या कार्यरत राहतील याकडे लक्ष द्यावे, माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत  एकाच समान बोधचिन्हाचा  वापर सर्वत्र करावा, करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या बाबींचे नियमित पालन करावे आणि नागरिकांच्या सहभागाने महाराष्ट्र निरोगी सदृढ बनविण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहावे, अशा सूचना दिल्या.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यावेळी म्हणाल्या की, ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी  रायगड जिल्ह्यात एकूण 1 हजार 500 पथके नेमण्यात आली असून त्यांना स्वत:ची ओळखपत्र दाखवूनच नागरिकांशी संपर्क करण्याच्या, या मोहिमेंतर्गत क्षेत्रीय पातळीवर काम करण्यासाठी कर्मचारी वा स्वयंसेवक हे वय वर्षे 25 ते 40 या वयोगटातीलच असावेत, त्यांनी इतरांबरोबरच स्वत:ची काळजी घेत काम करणे अपेक्षित आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान 2 बेड राखीव ठेवून कोविड कॉर्नर निर्माण करण्याबाबतचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी तसेच जवळपास 120 व्हेटिंलेटर्स उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोविड-19 मधून बरे झालेल्या रुग्णांच्या इतरांना प्रोत्साहन व बळ मिळेल अशा मुलाखती प्रसारमाध्यमांद्वारे सर्वत्र प्रसिद्ध केल्या जाणार असून जनजागृती,  प्रचार प्रसिद्धीवर अधिक भर देण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक सक्षम करणे गरजेचे असून तसे झाल्यास मृत्यूदराचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल असे सांगून हे सर्वेक्षण सर्वांसाठी आहे. या एका भावनेने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सक्रीय सहभागाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात सर्वस्तरावर यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना रायगड जिल्ह्यात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’  ही मोहीम कशा प्रकारे राबविण्यात येत आहे याविषयी सांगताना जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या की, पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्व यंत्रणा जोमाने काम करीत आहे. पालकमंत्री महोदयांनी स्वत: स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत गृहभेटी देऊन ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेविषयी  मोठ्या प्रमाणावर जनजागृती होईल, यासाठी प्रयत्न केले आहेत. समाजातील सर्व स्तरावर शासकीय यंत्रणा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरु युवा केंद्राचे युवक, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांची मदत घेतली जात आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत फ्लेक्स, बॅनर, वृत्तपत्र प्रसिध्दी आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रसिध्दी करण्यात येत आहे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यात एकूण 7 लाख 75 हजार 225 घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट असून आजपर्यंत 1 लाख 64 हजार 329 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण पथकाला आरोग्य सुरक्षाविषयक सर्व प्रकारची आवश्यक साधन सामुग्री पुरविण्यात आली आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे आयोजित या बैठकीस पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.अनिल परब, पालक सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा करोना टास्क फोर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक