*पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा*


          अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी  दि.1 सप्टेंबर 2012 ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत तालुकास्तरीय सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या अधिनस्त असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 व श्रेणी-2 यांच्या स्तरावर 100%  अनुदानावर प्राप्त झालेल्या लसींचा आपल्या पशुधनासाठी पुरेपूर लाभ घ्यावा व आपल्या पशुधनाचे लाळ-खुरकत रोगापासून संरक्षण करावे, यासंदर्भात काही सूचना अथवा तक्रार असल्यास जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड-अलिबाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद  डॉ.आर्ले यांनी केले आहे.

           महाराष्ट्र शासनाकडून पशुधनामधील संसर्गजन्य लाळ-खुरकूत व सांसर्गिक गर्भपात या रोगावरील लसीकरण कालबद्ध वेळेत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम केंद्र पुरस्कृत असून राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2020 पासून राबविण्यात येणार आहे.

           या कार्यक्रमास दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी प्रत्यक्ष सुरुवात झाली असून तालुकास्तरावर गठीत केलेल्या पथकांद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. हा कार्यक्रमकरिता केंद्र शासनाकडून शंभर टक्के निधी प्राप्त झालेला असून या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 100% गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, वराह यांना सहा महिन्याच्या अंतराने वर्षातून दोन वेळा परंतु सहा ते आठ महिने वयोगटातील 100% गायीच्या कालवडी आणि म्हशीच्या पारड्यांना एक वेळा सांसर्गिक अंतर्गत एफ.एम.डी व ब्रुसेला प्रतिबंधक लस, जनावरांना ओळख पटविण्यासाठी कानात लावायचे टॅग व ॲपलिकेटर तसेच आवश्यक शीतसाखळी सुविधा लसीकरण, साहित्य व मानधन यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबविला जात आहे.

           या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे जिल्ह्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याकरिता जिल्हा व तालुकास्तरावर सनियंत्रण समिती गठीत करण्यात आलेली आहे.

*जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती-* अध्यक्ष-जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग, सदस्य-अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड-अलिबाग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, सदस्य सचिव- सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, रायगड विभाग.

*तालुकास्तरीय सनियंत्रण समिती*- अध्यक्ष- तहसिलदार, सदस्य-सहाय्यक आयुक्त ,पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, रायगड-अलिबाग, सभापती, पंचायत समिती, अलिबाग, पशुधन विकास अधिकारी श्रेणी-1, झिराड, ता.अलिबाग, सदस्य सचिव-पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, रायगड-अलिबाग.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक