अभियंता दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून समस्त अभियंत्यांचे ऋण व्यक्त

 


                 अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :-  अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात अलिबाग, मुरुड, पेण व पाली असे चार तालुके आहेत.  करोना विषाणू संक्रमण,निसर्ग चक्रीवादळ,अतिवृष्टी यासारख्या संकटकाळात अत्यंत कमी वेळात, असंख्य अडचणीवर मात करून अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लोकोपयोगी अनेक उल्लेखनीय कामे पूर्ण करुन  जिल्हा प्रशासनास हस्तांतरित करण्यात आली. याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांतर्फे जिल्ह्यातील समस्त अभियंत्याचे अभियंता दिनानिमित्त ऋण व्यक्त करण्यात आले.

 या अभियंत्यांकडून अलिबाग जिल्हा रुग्णालय येथील वॉर्ड, केळुसकर विद्यालय येथील कोविड केअर सेंटर, नेहुली जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटर,सारंग विश्रामगृह येथे कोविड केअर सेंटर,पेण उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड केअर सेंटर,  मुरुड शासकीय विश्रामगृह येथील कोविड केअर सेंटर,  अलिबाग जिल्हा रुग्णालय येथे नव्याने स्थापित करण्यात आलेली करोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा ही कामे अत्यंत विक्रमी वेळेत उभारण्यात आले.

 रायगड जिल्ह्यामध्ये दि.3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळ धडकले, या चक्रीवादळाच्या तडाख्याने रस्ते, शासकीय इमारतींची अतोनात हानी झाली, रस्त्यालगत असलेले मोठे वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे रस्ते वाहतूकही बंद झाली होती. या विभागांतर्गत एकूण 289.90 कि.मी. लांबीचे राज्य मार्ग व  182.71 कि.मी. लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग येतात, या रस्त्यांपैकी 145.80 कि.मी. लांबीचे रस्ते बाधित झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने सर्वप्रथम रस्ते वाहतूक पूर्ववत केली.त्यामुळे जिल्हा मुख्यालयात मदतकार्य वेळेत पोहोचण्यास मदत झाली.  पडझड झालेल्या शासकीय इमारतींची आवश्यक असणारी दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तात्काळ करून देण्यात आली.  त्यामुळे शासकीय कामकाज करताना अडचण भासली नाही.  

 अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंत्यांची 5 पदे तर शाखा अभियंत्यांची 15  पदे रिक्त आहेत.  अशा परिस्थितीतही उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय कामकाज पूर्ण क्षमतेने करण्यास प्रयत्नशील आहे. या संपूर्ण संकटकालीन परिस्थितीमध्ये कार्यकारी अभियंता राहुल मोरे यांच्या नेतृत्वाखाली शाखा अभियंता ए.एस.जगे, कनिष्ठ अभियंता राहुल बागुल, रोहित पटेल, धनश्री भोसले, प्रविण कोकरे, पेण शाखा अभियंता दामोदर पाटील, बी.आर. चव्हाण, सुधागड-पाली शाखा अभियंता दिलीप मदने, सुधागड-पाली कनिष्ठ अभियंता तेजस ढेरे, मुरुड कनिष्ठ अभियंता पल्लवी एकंडे, अक्षय माने, अमित लोंढे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश बिरगावले यांनी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक