माझे कुटुंब-माझी जबाबदारी" मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

 

       अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :- गेल्या काही महिन्यांपासून आपण सर्वचजण करोना विषाणूशी लढाई लढत आहोत. नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी शासन आणि प्रशासनही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. करोनाचा सर्वत्र वाढत असलेला प्रादूर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 15 सप्टेंबरपासून शासनाने माझे कुटुंब-माझी जबाबदारी या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ केला असून जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या शासनाच्या आरोग्य तपासणी पथकाला उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे, असे आवाहन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित "माझे कुटुंब-माझी जबाबदारी" या मोहिमेच्या जनजागृती कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. 

       यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे हे तसेच  इतर सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

       या बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, "माझे कटुंब-माझी जबाबदारी" मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी, कोमॉर्बिड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. या मोहीम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार केली आहेत. रायगड जिल्ह्यासाठी 1 हजार 500 आरोग्य पथके तैनात केली आहेत.  एका पथकामध्ये 1 आरोग्य कर्मचारी आणि 2 स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक असतील. एक पथक दररोज 50 घरांना भेट देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे  तापमान, Sp02 तपासणे तसेच  Comorbid Condition आहे का याची माहिती घेईल.  प्रत्येक 5 ते 10 पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भसेवा दिली जाईल. घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री-कोविड, कोविड आणि पोस्ट- कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगितले जातील. लोकप्रतिनिधी व खाजगी रुग्णालय, स्वयंसेविका यांचा या मोहिमेसाठी सहभाग घेतला जात आहे. 

   "माझे कुटुंब-माझी जबाबदारी" ही मोहीम कोविड-19 साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल आणि सर्व संशयीत कोविड-19 रुग्ण आणि कोमॉर्बिड व्यक्ती यांना तपासणी, चाचणी व उपचार या सेवा मिळतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देवून जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गट, मंडळ इ. ठिकाणी ही मोहिम राबविली जाणार आहे, या मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी तसेच स्वयंसेवकांनी  स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेऊन ही मोहीम यशस्वीपणे पार पाडा, असेही पालकमंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.

      बैठकीनंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी  अलिबाग येथील लालबाग परिसरास भेट दिली व तेथील  गृहभेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधून त्यांना या मोहिमेचे महत्त्व सांगून या मोहिमेचा प्रारंभ केला. यावेळी उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, नगरसेविका वृषाली ठोसर, नगरसेवक अजय झुंजारराव, गौतम पाटील, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, प्रांताधिकारी शारदा पोवार,  तहसिलदार सचिन शेजाळ,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुहास घासे, मुख्याधिकारी महेश चौधरी, इतर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी  आदि उपस्थित होते.

      यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी म्हणाल्या की, "माझे कुटुंब-माझी जबाबदारी" या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी जबाबदारीने काम पार पाडावे. लोकांशी आपुलकीने बोलून त्यांना या मोहिमेचा उद्देश आणि उपयुक्तता समजावून सांगावी.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक