“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन..” उक्तीप्रमाणे जीवनाची वाटचाल करावी --जिल्हाधिकारी निधी चौधरी

 



 

अलिबाग,जि.रायगड दि.29 (जिमाका) :-  जीवनाचा दृष्टीकोन विशाल ठेवून कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.. या उक्तीप्रमाणे फळाची अपेक्षा न करता जीवनात चांगले कर्म करीत जीवनाची वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज येथे केले.  

जिल्हा प्रशासन आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहा, स्पर्धा विश्व ॲकडमी, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान तसेच माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेची विस्तृत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे ऑनलाइन व्याख्यान गुगल मिट द्वारे आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा  प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबागच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहाच्या अध्यक्षा सुचिता साळवी, जे.एस.एम.कॉलेज, अलिबागचे प्राध्यापक प्रेम आचार्य, स्पर्धा विश्व ॲकडमी रायगडचे संचालक तसेच  स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक युवती उपस्थित होते.  

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्वप्रथम माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेविषयी विस्तृत माहिती विषद करून ही मोहीम जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तरुण-तरुणींनी स्वयंसेवक म्हणून पुढे यावे, असे आवाहन केले.   स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकास याविषयी बोलताना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्वतःचा आतापर्यंतचा जीवन प्रवास सांगून त्या म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जी भाषा सर्वात चांगली येते व समजते त्याच भाषेची निवड अभ्यासासाठी करावी.  कोणत्याही विषय वा गोष्टीसाठी मनापासून तयारी आवश्यक आहे.  शासकीय व्यवस्थेत येऊन सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी चांगला अधिकारी बनणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच एक चांगली व्यक्ती असणे महत्त्वाचे आहे.  

रायगड जिल्ह्यातून जास्तीत जास्त युवक-युवतींनी प्रशासकीय सेवेत यावे, वृत्तपत्रांचे, अवांतर पुस्तकांचे नियमित वाचन करावे, आकाशवाणीवरील बातम्या ऐकाव्यात, परीक्षा काळात सोशल मीडियाचा वापर कमी करावा, आपला दृष्टीकोन जागतिक व देशपातळीवरील असावा, असे सांगून सकारात्मक दृष्टीकोन, मानसिक कणखरता हे गुणही स्पर्धा परीक्षेतील यशासाठी आवश्यक आहेत, स्वतःची क्षमता ओळखून आयुष्याचे निश्चित ध्येय वयाच्या अठराव्या वर्षीच पक्के करावे, असे त्यांनी शेवटी सांगितले.  

या ऑनलाईन संवादावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक