एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेश प्रक्रिया सुरु


         अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :- आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशाकरिता स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे प्रस्तावित होते तथापि करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सद्य:स्थितीत राज्यातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तसेच ऑनलाइन परीक्षा घेण्याकरिता परिस्थिती अनुकूल नाही. यामुळे एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल शैक्षणिक वर्ष 2020-21 प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षा रद्द करून त्याऐवजी विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.

           एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल इयत्ता सहावीच्या वर्गात नवीन प्रवेश व इयत्ता सातवी, इयत्ता नववी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या प्रथम सत्राच्या एकूण नऊशे गुणांची गुणपत्रिका mtpss.org.in या लिंकवर अपलोड करावयाची आहे. कोणत्या वर्गामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे, त्याकरिता विद्यार्थ्यांचे कोणते गुणपत्रक लिंकवर अपलोड करावयाचे आहे, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे-

           इयत्ता सहावी- इयत्ता पाचवीच्या प्रथम सत्रातील गुणपत्रिका, इयत्ता सातवी- इयत्ता सहावीच्या प्रथम सत्रातील गुणपत्रिका, इयत्ता आठवी- इयत्ता सातवीच्या प्रथम सत्रातील गुणपत्रिका, इयत्ता नववी- इयत्ता आठवीच्या प्रथम सत्रातील गुणपत्रिका.

          संबंधित पालकांनी आपल्या पाल्यास ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचे गुण mtpss.org.in या लिंक वर भरावयाचे आहेत. लिंकवर माहिती भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश हे त्यांच्या पालकांच्या मूळच्या राहण्याच्या पत्त्यानुसार संबंधित प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यान्वित असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मध्ये देण्यात येतील. ज्या प्रकल्पांतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल नाही, अशा प्रकल्पातील विद्यार्थ्यांना लगतच्या प्रकल्पात कार्यान्वित असलेल्या शाळेत प्रवेश देण्यात येईल, याची विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंद घ्यावी, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण च्या प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक