पहिली ते दहावी शिकणाऱ्या धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 

 

अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मा.पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन या धार्मिक अल्पसंख्यांक इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते, तरी गरजू व पात्र धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.

 नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांने अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे.  ही योजना इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व शासकीय, निमशासकी, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित मान्यताप्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी आहे.  

अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा.  फक्त इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट लागू राहणार नाही.  पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे.  एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा धर्म, कुटुंबाचे उत्पन्न व टक्केवारी इत्यादी माहिती अचूक भरणे,  धर्म, उत्पन्न, गुणपत्रक, आधार कार्ड, आधार नोंदणी पावती, विद्यार्थ्याचा फोटो, बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांकडे सादर करणे, पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असणे, या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसणे, याबाबी आवश्यक असून एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थींनींसाठी राखीव आहे.  

सन 2019-20 मध्ये निवड झालेल्या /शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि या वर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सन 2020-21 करिता नूतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.  नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल.   एका विद्यार्थ्याने नवीन /नूतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरविले जातील.  विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेचे हवे, नसेल तर पालकांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याची माहिती भरता येईल परंतु हे बँक खाते क्रमांक फक्त दोन पाल्यांसाठी वापरता येईल.  इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांची नवीन नूतनीकरण अर्ज National Scholarship Portal (NSP2.0) (www.scholarships.gov.in) हे संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील.  हे अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.  शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक अनिवार्य आहे व तो क्रमांक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी संलग्न केलेला असणे आवश्यक आहे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भाऊसाहेब थोरात यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक