महाड येथे कायमस्वरुपी एनडीआरएफ पथक कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील* *--पालकमंत्री कु.आदिती तटकरे


    अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :- नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाड तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मात्र अनेक दुर्घटना घडत असतात. त्यामुळे तालुक्यातील होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवेळी बचावकार्यासाठी महाड येथे कायमस्वरुपी एनडीआरएफचे एक पथक कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले. 

      जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित महाड येथील इमारत दुर्घटनेमध्ये मदत केलेल्या स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार समारंभास कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

       यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे,प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार सतिश कदम, तहसिलदार सुरेश काशीद आदि उपस्थित होते.

     यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात होणाऱ्या दुर्घटनेत बचाव कार्यासाठी लागणारी उपकरणे, साधनसामुग्री शासन, प्रशासनाकडून पुरविण्यात येतील. महाड येथील इमारत दुर्घटनेत बचावकार्यासाठी मदत केलेल्या  एनडीआरएफचे जवान, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, अधिकारी व कर्मचारी यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 

      जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी म्हणाल्या की, आपत्तीबद्दल जनजागृती करण्यात येईल. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल. आपत्ती प्रतिसाद दलात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांना प्रशिक्षण देण्यात येईल.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक