पनवेल उपजिल्हा रूग्णालयात व्हेंटिलेटर वाढविण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे निर्देश

 


 

 अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :-   कोविड रूग्णांना दिवसेंदिवस ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी पनवेल उपजिल्हा रूग्णालयात आणखी दहा व्हेंटिलेटर वाढविण्याचे निर्देश तसेच खासगी रुग्णालयांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा देण्यासोबत आणखी काही रुग्णालयांना कोविड दर्जाची परवानगी देण्याचे निर्देश पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज दिले.

            पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी  संबंधितांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते. त्यावेळी त्यांनी हे निर्देश  दिले.

            यावेळी या ऑनलाईन बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, पनवेल महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पनवेल महापालिका उपायुक्त संजय शिंदे, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, डॉ. गिरीश गुणे आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू सहभागी झाले होते.

            पीएम केअर फंडातून आलेल्या वीस व्हेंटिलेटरपैकी दहा व्हेंटिलेटर डी. वाय. पाटील रूग्णालयास देण्यात आले आहेत. उर्वरित 10 व्हेंटिलेटर उपजिल्हा रूग्णालयात कार्यान्वित करण्यात यावेत, अशी कांतीलाल कडू यांची मागणी होती. त्या अनुषंगाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी हे व्हेंटिलेटर उपजिल्हा रूग्णालयात कार्यान्वित करण्यात यावेत, त्यासाठी लागणारा आवश्यक निधी तात्काळ देण्यात येईल,असे सांगितले.

            खासगी डॉक्टर पुरेसा पगार देवून किंवा जाहिराती देवूनही प्रतिसाद देत  नसल्याची खंत महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने अतिदक्षता विभाग चालविणे दिवसेंदिवस अवघड होत असल्याबाबतची वस्तुस्थिती त्यांनी पालकमंत्री कु.तटकरे यांच्याकडे मांडली. शिवाय खासगी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली म्हणून स्वास्थ हॉस्प‍िटलने महापालिकेविरुध्द न्यायालयात दावा दाखल केला असून  या रुग्णालयाने महापालिकेकडे  दरमहा 5 कोटी रूपये नुकसान भरपाई मागितली असल्याची माहिती त्यांनी यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना दिली.

अतिदक्षता विभागामध्ये  काम करण्यासाठी खासगी डॉक्टरांना शासनाच्या  नियमानुसार वेतन दिले जाते. त्यामुळे शासन नियमांच्या पलिकडे जाऊन त्या डॉक्टरांना जास्त वेतन  देणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

त्यावर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शहरांच्या दृष्टीने विचार करता अलिबाग किंवा पनवेल अशी तुलना करणे उचित ठरणार नाही, असे सांगून पनवेलच्या शेजारी नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे अशी मोठी शहरे असल्याने पनवेलच्या डॉक्टरांचीही पगाराची अपेक्षा जास्त असू शकते, असे मत व्यक्त केले. कोणत्याही परिस्थितीत पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आणखी दहा व्हेंटिलेटर वाढवून घ्यायचे आहेत. त्याशिवाय भविष्यातील परिस्थितीचा विचार करुन करोनाचा मुकाबला करताना आणखी काही खासगी रुग्णालयांशी संपर्क साधून अथवा त्यांचे प्रस्ताव आल्यास तातडीने त्यांना कोविड रूग्णांसाठी परवानगी देण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री कु. तटकरे यांनी आयुक्त श्री.देशमुख यांना दिले. त्याशिवाय दोन दिवसात बैठक बोलावून यावर मार्ग काढण्याचेही सूचित केले.

            खासगी डॉक्टरांच्या वेतनासहित अन्य काही महत्वाच्या मुद्द्यांवरही डॉ. गिरीश गुणे यांनी सखोल चर्चा घडवून आणली. त्यांनी उपजिल्हा रूग्णालयाची टीम, डॉ. येमपल्ले यांचे विशेष अभिनंदन करून कोविड रूग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.

            खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होत असल्याने तातडीने त्यांना सरकारी दरात ते उपलब्ध व्हावे. ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याचा थेट परिणाम रूग्णांवर होतो. तो विषय अतिशय गंभीर असल्याचे श्री.कडू यांनी मत मांडले.  त्याविषयी जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी सांगितले आहे की, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून खासगी डॉक्टरांनी त्यांच्याशी संपर्क साधावा.  रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर आणि पेण या तालुक्यांमध्येच ऑक्सिजन तयार करणारे कारखाने असून छत्तीसगड या राज्यालाही आपण ऑक्सिजन पुरवित आहोत. असेही त्या म्हणाल्या.

            रायगड आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला काम करायचे असून आपणच त्यांना ऑक्सिजन पुरवू या, असे मत पालकमंत्री कु. तटकरे यांनी यावेळी मांडले. यामुळे आता पनवेलसह रायगड जिल्ह्यात ऑक्सिजनचा समतोल पुरवठा होणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात आणि कोविड रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक