माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिमेत रुरल अँड यंग फाउंडेशन आणि अभाविप चे प्रशासनास मोलाचे सहकार्य 26 स्वयंसेवकांनी 763 कुटुंबांना भेटी देऊन 2 हजार 229 नागरिकांची केली आरोग्य तपासणी

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.7 (जिमाका) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दि. 15 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली.  या मोहिमेस संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळाला. या मोहिमेचे स्वरूप अधिक व्यापक होण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी होण्यासाठी शासनाकडून आवाहन करण्यात आले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देताना रायगड जिल्ह्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अलिबाग शाखा तसेच रुरल अँड यंग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या उत्साहाने प्रशासनाच्या हातात हात घालून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.  या अभियानात स्थानिक प्रशासन आणि अभाविप व रुरल अँड यंग फाउंडेशन, रायगड यांच्या 26 स्वयंसेवकांनी तहसिलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी दिप्ती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुक्यातील सारळ, पेढांबे, किहीम, कुसुंबळे, खंडाळे (सागरगड वाडी) व नागाव अशा सहा ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य सर्वेक्षणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले.

यावेळी या स्वयंसेवकांनी नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजणे, ऑक्सिजनची पातळी मोजणे त्याचबरोबर करोनासारख्या आजाराशी लढताना घ्यावयाच्या काळजीबाबत प्रबोधन तसेच जनजागृतीचे काम केले.  या सर्वेक्षणाद्वारे तब्बल 763 कुटुंबांना भेटी देऊन या स्वयंसेवकांनी 2 हजार 229 नागरिकांची तपासणी करण्याच्या कामात आरोग्य यंत्रणेला बहुमोल सहकार्य केले.  

या कामासाठी सुशील साईकर, श्रेयस जोगळेकर, कमलेश ठाकूर, यश म्हात्रे या तरुणांनी पुढाकार घेतला.  अशा प्रकारे शासनाला माझे कुटुंब-माझी जबाबदारी  ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांचे जिल्हा प्रशासनाने आभार मानले आहेत.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक