केंद्र व राज्य शासनाची धोरणे, योजना व कायदे यांच्या अंमलबजावणीसाठी “अभ्यास गट" स्थापित करण्याचे पालकमंत्री आदिती तटकरेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

 

अलिबाग, जि.रायगड, दि.22(जिमाका):- रायगड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाची विविध धोरणे, योजना व कायदे यांच्या अंतर्गत विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील विभागामार्फत त्यांची विहित कालावधीमध्ये अंमलबजावणी पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तथापि जिल्ह्यातील सर्वच सामाजिक घटकांपर्यत लाभ पोहोचविणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, शासनाचे अर्थसहाय्य प्राप्त करणे, प्रशासकीय विभागामध्ये समन्वय राखणे, त्यामधील अडीअडचणी सोडविणे व त्यानुषंगाने जिल्हास्तरावर जाणकार, अनुभवी व अभ्यासू अधिकारी यांचा सहभाग घेण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाची धोरणे, योजना व कायदे यांच्या अंमलबजावणीसाठी " अभ्यास गट " स्थापित करण्यासंबंधी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

पालकमंत्री कु.तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली जिल्हास्तरावर प्रशासकीय विभागातील जाणकार, अनुभवी व अभ्यासू वरिष्ठ अधिकारी यांचा " अभ्यासगट " स्थापित करावा . त्यामध्ये प्रामुख्याने क्षेत्रीय अधिकारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था व तत्सम क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींचा समावेश करावा. या अभ्यासगटामार्फत प्रामुख्याने महसूल व वन, ग्रामविकास, आदिवासी विकास, महिला व बालविकास, कृषी, पशूसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभाग, इत्यादी विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेली प्रमुख धोरणे, योजना व कायदे याची निश्चिती करावी. (उदा. महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिनियम, 1972, वन हक्क अधिनियम, 2005, सी.आर.झेड नियमावली, महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, कातकरी उत्थान अभियान,  राष्ट्रीय आरोग्य अभियान, इत्यादी.), निश्चित केलेल्या बाबींच्या अंमलबजावणीसाठी विहित कार्यपद्धती व कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा. त्याप्रमाणे जिल्हास्तरावर अंमलबजावणी करणाऱ्या विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व सर्व संबंधित इतर घटकांसाठी दर महा प्रशिक्षण वर्ग, चर्चासत्र, मार्गदर्शन शिबीर व बैठका अशा स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करावे, त्याबाबत व्यापक जनजागृती व प्रसिद्धी दयावी, अभ्यास गटाने शासनाची धोरणे, योजना व कायदे यांच्या अंमलबजावणीमध्ये सुलभता व सुसूत्रता ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार त्यामध्ये करावयाच्या सुधारणाबाबत विचारविनिमय करुन, संबंधित विभागामार्फत त्याबाबतचे प्रस्ताव तयार करुन शासनास सादर करावेत, शासन स्तरावरील आवश्यक धोरणांमधील सुधारणा, मान्यता, अर्थसहाय्य व तत्सम बाबींबाबत " अभ्यास गटा " ने सुचविलेल्या उपाययोजना व त्यांच्या अंमलबजावणी कार्यक्रमाबाबत दरमहा आढावा घेण्यात यावा, तसेच " अभ्यास गटा " च्या  कामकाजाबाबत त्यांनी सुचविलेल्या उपाययोजना व कार्यक्रमाबाबत राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड यांच्या स्तरावर नियमितपणे आढावा घेण्यात येईल आणि त्यानुसार शासन स्तरावर आवश्यक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल., ही कार्यवाही पूर्ण करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी " अभ्यास गट " स्थापित करण्याबाबत लेखी आदेश निर्गमित करावेत व त्याबाबत सर्व विभागांसाठी सर्वसमावेशक निदेश परिपत्रकाद्वारे निर्गमित करावेत, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून  रायगड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी लोकप्रतिनिधी, जनता, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था व इतर सामाजिक घटक यांचा अनुभव व सहकार्य घेवून सामाजिक व पायाभूत विकासासाठी प्रयत्नशील व कटिबद्ध राहूया, असा संकल्प केला  आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक