"होवू या सारे एकसंघ, करूया एचआयव्हीला प्रतिबंध" आंतरराष्ट्रीय युवा दिन व पंधरवडानिमित्त जिल्हा रुग्णालयाकडून आयोजित विविध स्पर्धांचे निकाल जाहीर

 

वृत्त क्रमांक:-1257                                                                                            दिनांक:- 08 ऑक्टोबर 2020

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.8 (जिमाका) :-  आंतरराष्ट्रीय युवा दिन व पंधरवडानिमित्त यावर्षी  विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थानी सहभागी होऊन ऑनलाईन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी केले होते. 

या आवाहनाला उत्कृष्ट प्रतिसाद देऊन खालील विध्यार्थानी सहभाग घेतला.  त्यामध्ये एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती या विषयावर ऑनलाईन पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली असून त्यामध्ये डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी आर्टस्, कॉमर्स व सायन्स कॉलेज, गोवे कोलाड येथील कु. प्रार्थना प्रसन्ना बेटकर हिने प्रथम क्रमांक मिळविला असून तिला रु. 500/-, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ, आर्टस्, सायन्स व कॉमर्स कॉलेज चोंढी, तालुका अलिबागची कु.  आसावरी अनिल राऊत, व्दितीय क्रमांकास रु.300/- तर के.एम.सी. कॉलेज खोपोली येथील कु. रुपेश मधुकर शिद, या विध्यार्थास तृतीय क्रमांकास रू. 200/-  अशी बक्षिसे देण्यात आली आहेत.  तसेच एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती या विषयी मास्क डिझाइनिंग स्पर्धा घेण्यात आली असून त्यामध्ये  लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ, आर्टस्, सायन्स व कॉमर्स कॉलेज चोंढी, ता.अलिबाग येथील सहभागी विध्यार्थी कु. नेहा म्हात्रे हिस प्रथम क्रमांकास रु.500/-, प्रिती राजेश चिरमुले हिला द्वितीय क्रमांकास रु. 300/- तर प्रियांका बबन आगलावे हिस तृतीय क्रमांकास रू. 200/-  अशी बक्षिसे देण्यात आली आहेत.  तसेच एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती या विषयावर सोशल मिडीयावर 1 मिनिटाचा प्रसारात्मक व्हिडिओ तयार करणारा  अश्विन शिवाजी शिंदे, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ, आर्टस्, सायन्स व कॉमर्स कॉलेज चोंढी, अलिबाग  यांस प्रथम क्रमांक रु. 500/- असे बक्षिस देण्यात आले आहे. 

प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई यांच्या सूचनेनुसार  दि.12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन व पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रायगड, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्यामार्फत या दिवसाचे औचित्य साधून विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करून युवा वर्गामध्ये एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती केली जाते. 

             युवा वर्ग हा  एचआयव्ही/एड्सच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा घटक असून युवक-युवतींमध्ये  एचआयव्ही संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे. याचे मुख्य कारण म्हणजे युवकांची ऊर्जा, उत्साह आणि धोका पत्करण्याची / बिनधास्त वर्तणूक असल्यामुळे त्यांच्यामध्ये  एचआयव्ही संसर्ग होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त आहे. याकरिता विविध गटांमध्ये  एचआयव्ही/एड्स संवेदीकरण करून एचआयव्ही/एड्स रुग्णांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे, कलंक व भेदभाव मिटविण्याकरिता प्रयत्न करणे. याकरिता रायगड जिल्ह्यातील 23 महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लबची स्थापना करून त्यांच्यामार्फत  एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती केली जाते व  एचआयव्ही तपासणी करिता प्रोत्साहन दिले. 

         प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था वडाळा, मुंबई यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात एचआयव्ही एड्सला प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती पर विशेष मोहीम राबविली जाते. रायगड जिल्ह्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड - अलिबाग यांच्यामार्फत एचआयव्ही/एड्स ला प्रतिबंध करण्यासाठी एचआयव्ही समुपदेशन व तपासणी तसेच एचआयव्ही एड्सची कारणे लक्षणे समज गैरसमज या विषयी शास्त्रीय माहिती देऊन जनजागृती करून एचआयव्ही/एड्सला प्रतिबंध केला जातो.

 

एचआयव्ही/एड्स विषयी शास्त्रीय माहिती खालीलप्रमाणे:-

एचआयव्ही म्हणजे काय ?

  मानवी प्रतिकार शक्तीचा – ऱ्हास करणारा विषाणू म्हणजे एचआयव्हीचा विषाणू होय.

एड्स म्हणजे काय ?

     Aquiard इम्यूनो डेफिशियएन्सी सिंड्रोम - मानवी प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे अशा व्यक्तीला अनेक आजारांचा प्रादुर्भाव होवू शकतो. अशा अनेक आजारांच्या समूहाला एड्स असे संबोधिले जाते.

एचआयव्ही/एड्सची कारणे.

 1) असुरक्षित लैंगिक संबंध - एका पुरुषाचा अनेक स्त्रियांशी तसेच एका स्त्रीचा अनेक पुरुषांशी असुरक्षित लैंगिक संबंध आल्यास त्यामध्ये एचआयव्ही संसर्गित पुरुष किंवा स्त्री यांचा असुरक्षित संबंध आल्यास एचआयव्ही संसर्ग होऊ शकतो.

2) एचआयव्ही संसर्गित सुई किंवा सिरिंजेस -  एचआयव्ही संसर्गित रुग्णांची सुई किंवा सिरींजेस निरोगी व्यक्तीस वापरल्यास एचआयव्ही संसर्ग होऊ शकतो.

3) एचआयव्ही संसर्गित रक्त किंवा रक्तघटक - एचआयव्ही संसर्गित रक्त किंवा रक्तघटक एखाद्या निरोगी व्यक्तीस दिल्यास एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो.

4)  एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या मुलास. - एखादी एचआयव्ही संसर्गित गरोदर माता असेल तर तिच्या मुलाला एचआयव्ही संसर्ग होऊ शकतो.

प्रतिबंधात्मक उपाय -

1) सुरक्षित लैंगिक संबंध - लग्नापूर्वी ब्रह्मचर्य (लग्नापूर्वी बाह्य संबंध टाळणे) विवाहित पुरुष किंवा स्त्री यांनी आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहणे गरजेचे आहे. 

2) निर्जंतुक केलेल्या सुई व सीरिंजेस चा वापर -   एखद्यावेळेस व्यक्तीस डॉक्टरांकडे जाणे अथवा उपचार घेणेची वेळ आल्यास सातत्याने नवीन सुई व सीरींजेस चा वापर करणे गरजेचे आहे.

3) प्रमाणित रक्तपेढी तुन रक्त व रक्तघटक घेणे - एखद्यावेळेस रक्ताची अथवा रक्त घटकाची गरज भासल्यास प्रमाणित रक्त पेढीतून रक्त घेणे गरजेचे आहे. तसेच घेण्यात येणाऱ्या रक्ताच्या सर्व चाचण्या झालेल्या असण्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

4)एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या मुलाला एचआयव्ही संसर्ग होऊ नये यासाठी तिला एआरटीची उपचार पद्धती सुरू करून तिच्या बाळाला जन्मानंतर 72 तासांच्या आत व 6आठवडे नेव्हिरापिन औषध दिल्यास एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येतो.

          जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड - अलिबाग अंतर्गत जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका दवाखाना तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी रुग्णालये यांच्यामार्फत मोफत एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केली जाते व एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती केली जाते. तसेच एचआयव्ही/एड्स ला प्रतिबंध केला जातो. एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती करणे करीता जिल्ह्यामध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत जागतिक एड्स दिन, आंतरराष्ट्रीय युवा दिन, महिला दिन, रक्तदाता दिन यासारख्या दिनांचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

       हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी तसेच एचआयव्ही एड्स ला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. संजय माने व डापकू टीम, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड- अलिबाग यांच्याकडून कार्यक्रमाचे नियोजन तसेच  अंमलबजावणी करण्यात आली. "होवू या सारे एकसंघ, करूया एचआयव्हीला प्रतिबंध" या घोषवाक्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील जनतेने या कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभाग घेऊन एचआयव्ही/एड्स प्रतिबंध व जनजागृतीकरिता सहकार्य करावे तसेच ज्या ठिकाणी एचआयव्ही समुपदेशन व तपासणीची सुविधा नाही अशा ठिकाणी डापकू कार्यालयामार्फत मोबाईल आयसीटीसी व्हॅन व इतर आयसीटीसीच्या माध्यमातून एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली आहे.

0000000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक