“कृषी पर्यटन धोरण” (भाग-1)

 

विशेष लेख क्र.35                                                                                   दिनांक :- 04 नोव्हेंबर 2020


 

शासनाने नवे पर्यटन धोरण जाहीर केले असून, या धोरणांतर्गत पर्यटन क्षेत्रामध्ये वार्षिक 10 टक्के उत्पन्न आणि राज्याच्या सकल उत्पन्नात पर्यटन क्षेत्राचा 15 टक्के वाटा प्राप्त करण्याचे तसेच या क्षेत्रात सन 2025 पर्यंत 1 दशलक्ष रोजगार निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी या धोरणांतर्गत ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन राबविण्याची संकल्पना समाविष्ट करण्यात आली आहे. यास अनुसरुन राज्याचे कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यासाठी शासनाने आवश्यक ती पाऊले उचलली आहेत.

राज्यातील सुमारे 55 ते 60 टक्के लोक प्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेढी पालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषी संलग्न विषयाचा एकत्रित विचार केल्यास, ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला निक्षितपणे चालना मिळू शकते. राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करुन देणे आणि शहरी पर्यटकाना शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळावा, यासाठी एक सुनियोजित व्यवस्था निर्माण करुन पर्यटन विकास साध्य करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या दि.06 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यात कृषी पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कसे असेल हे कृषी पर्यटन धोरणजाणून घेऊ..या लेखातून..!

 

 कृषी पर्यटनाचा उद्देश :

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून राज्याचा विकास साधणे, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, कृषी पर्यटनाला कृषी पूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील लोककला आणि परपरा यांचे दर्शन घडविणे, ग्रामीण महिला व तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, शहरी भागातील लोकांना/विद्यार्थ्यांना शेती आणि शेती पध्दती तसेच कृषी संलग्न व्यवसायाची माहिती उपलब्ध करुन देणे, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील राहणीमान उंचाविणे, पर्यटकांना प्रदूषणमुक्त, शांत व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव देणे, पर्यटकांना प्रत्यक्ष शेतातील कामाचा अनुभव देणे, शेतावरील कृषी मालाच्या प्राथमिक प्रक्रियेस प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील पडीक, गायरान आणि क्षारपड जमिनी उपयोगात आणणे, हा कृषी पर्यटनाचा उद्देश आहे.

 

कृषी पर्यटन केंद्राकरिता पात्र घटक : 

वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था, शासन मान्यता प्राप्त कृषी विज्ञान केंद्र,  कृषी महाविद्यालये (खाजगी व शासकीय), कृषी विद्यापीठे, शेतकऱ्यांनी स्थापन केलेली भागीदारी संस्था किंवा कंपनी, हे कृषी पर्यटन केंद्राकरिता पात्र असू शकतील.

 

कृषी पर्यटनासाठी बंधनकारक बाबी :-

  • कृषी पर्यटन केंद्र चालविताना शेती हा प्रमुख व्यवसाय तर पर्यटन हा पूरक व्यवसाय असावा,
  • खेडेगाव: कृषी पर्यटन केंद्र हे शहराच्या (महानगरपालिका, नगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत) हद्दीपासून किमान 1 किलोमीटर बाहेर आणि शक्यतो खेडेगावामध्ये असावे.
  • शेती क्षेत्र कृषी पर्यटन शेती आणि शेती संलग्न बाबींवर आधारित असल्यामुळे कृषी पर्यटन सुरु करण्यासाठी कमीत कमी 1 एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेती क्षेत्र असावे.
  • ज्या कृषी पर्यटन केंद्रात शालेय सहली आयोजित करण्यात येणार आहेत, त्या कृषी पर्यटन केंद्राचे क्षेत्र कमीत कमी 5 एकर असावे, या ठिकाणी 24 तास पाणी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी केंद्र चालकाची राहील,
  • शेतकरी पर्यटन केंद्र चालविणारी व्यक्ती वैयक्तिक शेतकरी असल्यास तो / ती स्वतः ती शेती कसणारा असावा. तसेच ही शेती त्याच्या स्वत:च्या अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे असणे आवश्यक आहे. म्हणजे 7/12 उतारा कुटुंबाच्या नावाने असणे आवश्यक आहे,
  • कृषी पर्यटन केंद्रांतर्गत राहण्याकरिता उभारण्यात येणाऱ्या खोल्या शक्यतो पर्यावरणपूरक असाव्यात (उदा. लाकूड, साथ, जांभा दगड, झोपडीवजा इ. बांधकाम असावे व त्यास सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे),
  • कृषी पर्यटन केंद्रचालकामार्फत भोजनाची व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, इ.सोयी-सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
  • पर्यटन धोरणात नमूद केल्याप्रमाणे इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अशा केंद्राना किमान एक शैक्षणिक सहल/भेट आयोजित करण्यात यावी,

 

आदर्श पर्यटन केंद्राकरिता इतर अनुषंगिक बाबी (ऐच्छिक बाबी):

  • पर्यटन केंद्र हे शांत, सुंदर, निसर्गरम्य अशा ठिकाणी असावे,
  • पर्यटन केंद्राच्या ठिकाणी एकाच वेळी विविध पीक पध्दतींचा अवलंब केला गेला असावा, जेणेकरुन पर्यटकांना शेतीतील विविधतेचा अनुभव घेता येईल. (उदा, अन्नधान्य, भाजीपाला, फळबाग, फुलशेती, रोपवाटिका इ.),
  • पर्यटन केंद्रावर घरगुती पध्दतीच्या, रुचकर, शक्यतो महाराष्ट्रीयन भोजनाची व्यवस्था असावी,
  • ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी, घोडेस्वारी, शेतीवरील विविध हंगामातील कामे दाखविण्याची सोय असावी,
  • पर्यटन केंद्रावर ग्रामीण खेळ (उदा. विटीदांडू, हूतूतू, लंगडी, झोका, लगोरी इत्यादी) खेळण्याची सुविधा असावी,
  • पर्यटन केंद्रावर ग्रामीण व पारंपारिक मनोरंजन कार्यक्रमाची व्यवस्था असावी, (उदा.पोवाडा, जागरण, गजनृत्य, लेझिम, भजन, किर्तन, आदिवासी नृत्य इ.),
  • पर्यटन केंद्राच्या परिसरात किल्ला, गिर्यारोहण, तलाव, नदी इ. निसर्गरम्य ठिकाण असल्यास त्याबाबत केंद्रचालकाने पर्यटकांना मार्गदर्शन करावे,
  • नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्राने दरवर्षी 16 मे हा कृषी पर्यटन दिन" म्हणून साजरा करावा,
  • कृषी पर्यटन केंद्राने शेतीमधील ताजा भाजीपाला, फळे, अन्नधान्य इ. माल पर्यटकांना विक्रीसाठी उपलब्ध करुन द्यावा,
  • नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रामार्फत दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे,
  • कृषी पर्यटनाचा उत्तम दर्जा टिकून राहण्यासाठी प्रतिवर्षी कृषी पर्यटन केंद्राची पर्यटन संचालनालयामार्फत तपासणी केली जाईल,
  • कृषी पर्यटन केंद्र प्लास्टिकमुक्त  विभाग म्हणून ओळखली जातील,
  • कृषी क्षेत्र कमी आकाराचे असल्यास आसपासच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कृषी संबंधित बाबी संबंधित शेतकऱ्याच्या सहमतीने पर्यटकांना दाखविता येतील,
  • सेंद्रीय शेती संदर्भात पर्यटकांना प्राधान्याने माहिती देण्यात यावी,
  • पर्यटन केंद्राच्या ठिकाणी स्थानिक कला, संस्कृती दाखविण्यासाठी साहित्य उपलब्ध करुन द्यावे,
  • पर्यटन केंद्रांनी पाणी बचतीचे नियोजन करावे,(उदा.ठिबक सिंचन, तुषार सिंचन),
  • वीजेकरिता सौर ऊर्जा, पवनचक्की यांना प्राधान्य द्यावे,
  • राज्याबाहेरील व विदेशी पर्यटक येत असल्यास केंद्रचालकास हिंदी/इंग्लिश भाषेचे ज्ञान असावे,
  • कृषी पर्यटन केंद्रचालक पर्यटकांना ग्रामीण समाजव्यवस्थेचा अनुभव देतील, (उदा.बलुतेदार, अलुतेदार, वासुदेव, डोंबारी, बहुरुपी इत्यादी).

 

कृषी पर्यटन केंद्रामार्फत पर्यटकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा :

शेतीसोबत खालीलपैकी एका किंवा अनेक किंवा सर्व सेवा कृषी पर्यटन केंद्रचालकांनी पर्यटकांना उपलब्ध करुन द्याव्यात- एक दिवसीय सहल (डे ट्रिप), निवास व्यवस्था, मनोरंजनात्मक सेवा (उदा,लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, साहसी खेळ,ग्रामीण खेळ),  कृषी कँपिंग (तंबू निवारा,), फळबागा व पदार्थ विक्री केंद्र (Product Sale) (उदा, संत्री / संत्र्याचा ज्यूस, द्राक्षे /वाईन, स्ट्रॉबेरी / स्ट्रॉबेरीपासून बनविलेले पदार्थ इ.)

 

निवास व्यवस्थाः

कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी पर्यटकांना निवास व्यवस्था उपलब्ध करुन देणाऱ्या कृषी पर्यटन केंद्राकरिता खालील बाबी लागू राहतील :-

  • शेतीचे क्षेत्र- 2 एकर पर्यंत, खोल्यांची संख्या- कमाल 4, खोल्यांचे आकारमान- किमान 150 चौ.मी.,
  • शेतीचे क्षेत्र- 2 एकरपेक्षा जास्त व 5 एकर पर्यंत, खोल्यांची संख्या- कमाल 6, खोल्यांचे आकारमान- किमान 150 चौ.मी.,
  • शेतीचे क्षेत्र- 5 एकर  व त्यापेक्षा जास्त, खोल्यांची संख्या- 8 खोल्या व शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था असलेले 2 लोकनिवास (25 गाद्या प्रत्येकी), खोल्यांचे आकारमान- किमान 150 चौ.मी. आणि लोकनिवासाचे आकारमान 700-800 चौ.फू.
  • प्रत्येक खोलीस जोडलेले शौचालय, बाथरुम आवश्यक राहील.
  • या पर्यटक निवासस्थानाचे बांधकाम हे शक्यतो पर्यावरणपूरक असावे व त्यास सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे,
  • शालेय सहलीसाठी अथवा मोठया समूहासाठी 25 बेडची क्षमता असलेले जास्तीत जास्त दोन लोकनिवास (Dormitary) बांधता येतील. परंतू त्याकरिता किमान 5 एकर क्षेत्र असणे बंधनकारक राहील,
  • पर्यटन धोरण-2016 प्रमाणे आठ खोल्यांपर्यतच्या केंद्रासाठी खोल्या आणि सुविधांच्या बांधकामासाठी नगर रचना विभागाच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही.
  • आठपेक्षा जास्त खोल्या असलेली केंद्रे व्यावसायिक उपक्रम म्हणून ओळखली जातील आणि त्यासाठी नगर रचना विभागाची परवानगी आवश्यक असेल.

 

भोजन व्यवस्था व स्वयंपाकघर :- (सर्व प्रकारच्या सेवांकरिता बंधनकारक)

ü  नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रचालकाने पर्यटकांना भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी किमान 150 चौ.फू.आकाराचे स्वयंपाकघर असावे,

ü  कृषी पर्यटन केंद्र चालविण्यासाठी पर्यटन विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र घेणे तसेच आवश्यक त्या इतर सर्व विभागांच्या परवानग्या घेणे बंधनकारक राहील,

ü  तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी प्रथमोपचार साहित्य पेटी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी ठेवण्यात यावी,

ü  अग्निशामक यंत्र बसविणे आवश्यक राहील,

ü  जागतिक साथरोगासंदर्भात (उदा. कोविड- 19) सुरक्षिततेच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील,

ü  कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी जाण्यासाठी सुस्थितीतील पोहोच रस्ता Approach Road) तसेच पर्यटकांच्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था असणे आवश्यक आहे.

                                                                                   (क्रमश:)

   (मनोज शिवाजी सानप)

 जिल्हा माहिती अधिकारी

     रायगड-अलिबाग

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक