चालू खरीप व रब्बी हंगामातील कर्जतमधील मंजूर धानखरेदी केंद्रावर धान/भरडधान्य रागी (नाचणी) खरेदी होणार लवकरच सुरु

 


 

    अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेंर्गत आदिवासी उपाययोजना क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक यांनी नियुक्त केलेली अभिकर्ता संस्था उप प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय, शहापूर यांच्यामार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम 2020-2021 मध्ये जिल्हयातील कर्जत तालुक्यातील सुगवे येथील मंजूर धानखरेदी केंद्रावर धान/भरडधान्य रागी (नाचणी) खरेदी सुरु करण्यात येणार आहे. 

या भात खरेदीचा कालावधी खरीप पणन हंगाम दि. 01 ऑक्टोबर 2020 ते दि.31 मार्च 2021, रब्बी पणन हंगाम दि. 01 मे 2021 ते दि.30 जून 2021, भरडधान्य (मका/ज्वारी/बाजरी/रागी):- दि.01 नोव्हेंबर 2020 ते दि.31 डिसेंबर 2020 हा आहे.

धान भरडधान्य रागी/(नाचणी) खरेदीवेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतच्या 7/12 उताऱ्याची व गाव नमुना 8 (अ) ची छायांकित प्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरीता आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य धानाखालील क्षेत्र पाहून धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल.  शेतकऱ्यांचे 7/12 उताऱ्यानुसार पिकाखालील क्षेत्र, या वर्षाची पीक परिस्थिती (पैसेवारी), पिकाचे सरासरी उत्पादन या बाबी विचारात घेऊन, धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल.

ही खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. याकरीता खरेदी केंद्रावर धान भरडधान्य रागी/(नाचणी) खरेदी विक्रीकरीता आणताना प्रत्येक शेतकऱ्याने सोबत आपल्या आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुकाची छायांकित प्रत आणणे आवश्यक आहे. रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रांवर आणलेले, परंतु खरेदी न झालेले धान/भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबधित शेतकऱ्याची राहील. 

 धानाच्या आधारभूत किंमती- धान,भात (एफ ए क्यू) अ) साधारण- आधारभूत किंमती रुपये प्रति  क्विंटल- रुपये 1 हजार 868, शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष द्यावयाचा दर प्रति क्विंटल- रुपये 1 हजार 868, ब) अ दर्जा- आधारभूत किंमती रुपये प्रति  क्विंटल- रुपये 1 हजार 888, शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष द्यावयाचा दर प्रति क्विंटल- रुपये 1 हजार 888,  भरडधान्य- रागी- आधारभूत किंमत रुपये प्रति  क्विंटल- रुपये 3 हजार 295, शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष द्यावयाचा दर प्रति क्विंटल- रुपये 3 हजार 295,

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत केंद्र शासनाने विहीत केलेल्या नियमात बसणारे FAQ दर्जाचेच धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. केंद्र शासनाने हंगाम 2020-2021 करिता धानासाठी आद्रतेचे अधिकतम प्रमाण 17 टक्के विहीत केले आहे. या प्रमाणापेक्षा आर्द्रता जास्त आढळल्यास धानाची खरेदी करण्यात येणार नाही. भात खरेदी करताना ओलावा व आर्द्रतेचे प्रमाण 17 टक्के असल्याची खात्री करुनच धान/भरडधान्याची खरेदी करण्यात येईल.. कोणत्याही परिस्थितीत जास्त ओलसर किंवा बुरशीयुक्त धान/भरडधान्य खरेदी करु नये. विहीत प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता असलेले धान/भरडधान्य खरेदी केल्यास अभिकर्ता संस्थांनी वेळीच संबधितांवर दंडात्मक कारवाई करावी.

भरडधान्य स्वच्छ व कोरडे असून ते विक्री योग्य (मार्केटेबल ) असल्याची अभिकर्त्यांनी खातरजमा केल्यावरच भरडधान्य रागी (नाचणी) खरेदी करण्यात येईल. भरडधान्यासाठी केंद्र शासनाने हंगाम 2020-2021 करिता आद्रतेचे अधिकतम प्रमाण धानासाठी 14 टक्के विहीत केले आहे.

खरेदी केंद्रावर फक्त खरेदी किंमतीबद्दल दर फलक न लावता आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत असलेले धानाचा दर्जा, सूचना, नियम, खरेदी केंद्रे तसेच एफ.ए.क्यू. दर्जाची मानके इत्यादीबाबतची माहिती मराठीतूनच फलकावर दर्शविण्यात यावी. तसेच खरेदी केंद्र त्यास जोडण्यात आलेल्या गावांची नावे याची प्रसिद्धी प्रत्येक धान खरेदी केंद्रावर अभिकर्ता संस्थांनी द्यावी.

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या धान/भरडधान्याच्या किंमती, दर्जा, खरेदी केंद्र व खरेदी केंद्रास जोडण्यात आलेली गावे दर्शविणारे फलक सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इत्यादी ठिकाणी त्यांच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागावर प्रसिद्ध कराव्यात. केवळ शेतकऱ्याकडून उत्पादित झालेल्या नव्या धान/भरडधान्याची खरेदी करण्यात येईल. खरेदी केलेल्या धान/भरडधान्याची देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्याबाबत तसेच ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत धान/भरडधान्य खरेदी केलेल्या दिवसापासून पुढील 7 दिवसापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. खरेदी केंद्राची ठिकाणे व त्यास जोडलेली गावे यांची माहिती खरेदी अभिकर्ता संस्था म्हणून काम पाहणारे उप प्रादेशिक व्यवस्थापक, कार्यालय शहापूर, तहसिलदार कर्जत /गट विकास अधिकारी पंचायत समिती कर्जत तसेच उप अभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या सह.संस्था/ खरेदी विक्री संघ/ सह.भात गिरणी यांच्याकडे उपलब्ध आहे. 

            पणन हंगाम 2020-2021 मधील धान भरडधान्य खरेदी केंद्र व/त्यास जोडलेल्या गावांची यादी- 

जिल्हा- रायगड, उप प्रादेशिक कार्यालयाचे नाव- शहापूर, ता.कर्जत,  प्रस्तावित खरेदी केंद्राचे नाव- सुगवे, जोडलेल्या गावांची संख्या- 29, गावांची नावे- कशेळे, वाकस, वोशीर, वारे, सुगवे, ओलमन,झुगरे वाडी,चेई, चेवणे, कर्जत, पाथरज, नांदगाव, खांडस आंबिवली, वारे, बलिवरे, अंबेरपाडा, तुंगी, अंजप, मनीप, सिंघडोल, धोतरे, रजपे, कोटींबे, मोगरज, जामरुग, भाताची वाडी, किकवी, शिलार, पोही व संलग्न पाडे.                 

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक