उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी वाहनांच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी जमीन हस्तांतरण मंजूर पालकमंत्री आदिती तटकरेंचा महत्वपूर्ण निर्णय




        अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):-  नागरिकांकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय असून या कार्यालयांतर्गत नागरिकांना विनासायास त्यांची वाहनविषयक तसेच अन्य तत्सम कामांविषयी शासकीय सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. याचे महत्त्व ओळखून व गरज लक्षात घेऊन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी माणगाव तालुक्यातील जावळी येथे वाहनांच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी  जमीन देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले होते.

        त्यास अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी माणगाव तालुक्यातील जावळी येथे ब्रेक टेस्ट ट्रॅक बनविण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पेण करिता केलेल्या मागणी नुसार 2 हेक्टर आर शासकीय जागा हस्तांतरित करण्याचे आदेश पारित केले आहेत तसेच पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही संबंधितांना  दिले आहेत.

           शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रादेशिक अधिकारी कार्यालयास जवळपास किमान 250 मीटर लांबीचा ट्रॅक उपलब्ध करणे आवश्यक होते. त्याच बरोबर जिल्ह्यातील प्रादेशिक / उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांना वाहनांच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षांनीही कळविले आहे.

       यानुसार माणगाव तालुक्यातील जावळी येथे वाहनांच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येवून ती जागा प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांना हस्तांतरीत करण्यात आली आहे. यामुळे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पेण कार्यालयातून नागरिकांना विनासायास त्यांची वाहनविषयक तसेच अन्य तत्सम कामांविषयी शासकीय सोयी-सुविधा मिळतील, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.


00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड