आनंदाने शासकीय नियमांचे पालन करु अन् उत्साहाने दिवाळी साजरी करु..! कोविडच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी शासन सज्ज

 

विशेष लेख क्र.37                                                                         दिनांक :- 12 नोव्हेंबर 2020


सध्या राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोविड रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. परंतु जागतिक स्तरावरील कोविड उद्रेकाचे अवलोकन केले असता युरोपमधील अनेक देशांमध्ये कोविड आजाराची दुसरी लाट आलेली दिसून येत आहे.

युरोपियन देशांच्या उदाहरणावरून आपल्याकडे दुसरी लाट येण्याची शक्यता जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आहे, असे दिसते. या पार्श्वभूमीवर शासनाकडून काही महत्वाच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

काय आहेत या सूचना जाणून घेऊ या पुढील लेखातून..!

प्रयोगशाळा तपासणी आयसीएमआर मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू ठेवण्याची आवश्यकता- करोना उद्रेकाच्या सध्याच्या उतरणीच्या काळातही प्रयोगशाळा सर्वेक्षण सक्षमपणे सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. प्रयोगशाळा सर्वेक्षणामध्ये कोणताही हलगर्जीपणा न करता आय.सी.एम.आर संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संशयित रुग्णांच्या प्रयोगशाळा चाचण्या करण्याची आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दर दिवशी दर 10 लाख लोकसंख्येमागे किमान 140 तपासण्या करण्यात याव्यात, असे आपल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे, त्याचे पालन होणे आवश्यक आहे.   याकरिता प्रत्येक जिल्हा आणि मनपा क्षेत्रात प्रयोगशाळा चाचणी केंद्रे कार्यान्वित करुन त्यांची माहिती विविध माध्यमांतून जनतेला देण्यात यावी.

 फ्ल्यू सदृश्य आजाराचे (Influenza Like Illness -ILI) नियमित सर्वेक्षण - दुसऱ्या लाटेसंदर्भातील सतर्कतेचा इशारा (Early Warning Signal EWS) वेळेवर मिळावा, यासाठी आपण फ्लू सदृश्य रुग्णांचे सर्वेक्षण नियमितपणे करण्याची आवश्यकता आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत फिवर क्लिनिक या सर्वेक्षणात महत्वाची भूमिका बजावू शकतात.

एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम (आयडीएसपी) अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांच्याकडून इन्फ्ल्यूंझा सदृश्य रुग्णांच्या आठवडी अहवालाचे अवलोकन नियमितपणे होऊन करून साप्ताहिक ट्रेन्ड समजावून घेणे आवश्यक आहे.  याच पद्धतीचे सर्वेक्षण शहरी भागात महानगरपालिका दवाखाने आणि निवडक खाजगी रुग्णालयांमार्फत करण्यात येणे गरजेचे आहे.  या विश्लेषणातून ज्या भागातून या स्वरूपाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत, त्या भागांमध्ये कोविड प्रतिबंध व नियंत्रण विषयक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात.

यामध्ये खालील बाबींचा समावेश करावा-

  • अधिक प्रमाणात फ्ल्यू सारखे आजार असणारे रुग्ण आढळणाऱ्या भागात प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवावे.
  • गृहभेटीद्वारे सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक वेगाने व युद्धपातळीवर करण्यात यावे.

जनसंपर्क अधिक असणाऱ्या (Potential Super Spreaders) व्यक्तींचे विशेष सर्वेक्षण- आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने ज्या व्यक्तींचा जनसंपर्क किंवा सामाजिक संपर्क अधिक असतो, अशा व्यक्तींच्या माध्यमातून कोविड आजाराचा प्रसार अधिक वेगाने होतो, हे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे.  दुसरी लाट येण्यामध्येही अशा सुपर स्प्रेडर व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे लक्षात घेऊन अशा व्यक्तींचे सर्वेक्षण आणि प्रयोगशाळा तपासणी प्राधान्याने करण्याची आवश्यकता आहे. या व्यक्ती पुढीलप्रमाणे :-

v  छोटे व्यावसायिक गट - किराणा दुकानदार, भाजीवाले तसेच पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणारे इतर विक्रेते, हॉटेल मालक आणि वेटर्स

v   घरगुती सेवा पुरविणारे- वर्तमानपत्रे, दूध घरपोच करणारी मुले, घरगुती काम करणाऱ्या मोलकरणी आणि इतर नोकर, गॅस सिलेंडर वाटप करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिक विषयक कामे नळजोडणी दुरुस्ती अशी घरगुती कामे करणाऱ्या व्यक्ती, लॉन्ड्री, इस्त्रीवाले, पुरोहित

v   वाहतूक व्यवसायातील लोक - मालवाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पो चालक,रिक्षाचालक इत्यादी,

v   वेगवेगळी कामे करणारे मजूर - हमाली, रंगकाम, बांधकाम करणारे मजूर

v   सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर कर्मचारी

v   हाऊसिंग सोसायटी मध्ये काम करणारे सेक्युरिटी गार्ड सुरक्षारक्षक

v  आवश्यक सेवा पुरविणारे शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच पोलीस, होमगार्ड इत्यादी

अशा विविध गटांमधील व्यक्तींचे समूह स्वरूपात सर्वेक्षण तसेच प्रयोगशाळा तपासणी केल्यामुळे कोविड आजाराच्या प्रसाराचा वेग रोखण्यामध्ये यश मिळू शकते. याकरिता नियोजनबद्धरित्या हे विविध समूह तपासण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन प्रयोगशाळा तपासणीमध्ये किमान 50टक्के नमुने हे या गटातील व्यक्तींचे असावेत, या दृष्टीने नियोजन करावे.

रुग्णोपचार व्यवस्था - सध्या शहरी आणि ग्रामीण भागातील कोविडचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत कोविड आणि नॉन -कोविड रुग्णसेवेचा पुरेसा ताळमेळ ठेवण्यासाठी आणि जनतेला सर्व प्रकारच्या रुग्णसेवा सुरळीतरित्या मिळण्याकरिता रुग्ण उपचार व्यवस्थेसंदर्भात पुढीलप्रमाणे काही निर्णय घेण्यात यावेत –

Ø  प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण संख्येच्या प्रमाणानुसार सध्या कोविड उपचाराची पूर्ण जबाबदारी जिल्हा आणि शहरांमधील विशिष्ट रुग्णालयांवर सोपवावी.

Ø  सुपर स्पेशलिटी स्वरूपातील हॉस्पिटल्स आता कोविड रुग्णालय म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही.

Ø  जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये यासारख्या रुग्णालयांमध्ये कोविड तसेच नॉन कोविड अशा दोन्ही रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून त्याचा व्यवस्थित समतोल साधला जावा.

Ø  प्रत्येक तालुक्यासाठी विशिष्ट कोविड निगा केंद्र, कोविड आरोग्य केंद्र आणि कोविड रुग्णालय निश्चित करावेत आणि रुग्णांना संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिकांचे नियोजन करावे.

Ø  गरजेनुसार तातडीच्या वेळी कोविडसाठी अधिकच्या खाटा तात्काळ उपलब्ध करण्यासंदर्भात कृती योजना तयार असावी.

Ø  जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावरील टास्क फोर्सने स्थानिक परिस्थितीचा यथायोग्य आढावा घेऊन याबाबत निर्णय घ्यावेत.

सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार रुग्णालय व्यवस्थेचे कार्यान्वयन - कोविडच्या संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी प्रयोगशाळा नमुन्यांमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे शेकडा प्रमाण (Positivity Rate) किती आहे, यानुसार सतर्कतेचे इशारे लक्षात घेऊन त्यानुसार रुग्णोपचार सुविधा कार्यान्वित करणे आवश्यक आहे.

  • प्रयोगशाळा नमुन्याचे पॉझिटिव्हीटी प्रमाण- 7 टक्के पेक्षा कमी, रुग्णोपचार व्यवस्थेच्या अनुषंगाने करावायची कार्यवाही- रुग्ण संख्येनुसार जिल्हा आणि मनपा स्तरावर किमान 5 ते 7 रुग्णालय समर्पित कोविड रुग्णालये म्हणून कार्यरत ठेवावीत. (एकूण कोविड रुग्णालयांच्या 20 टक्के)
  • 7 ते 10 टक्के,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आणि प्रत्येक शहरी प्रभात/ तालुका विभागातील एक रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित करावे. ( एकूण गुणांच्या 40 टक्के)
  • 11 ते 15 टक्के, आवश्यकतेनुसार आणखी 20 टक्के कोविड रुग्णालये कार्यान्वित करावीत.
  •  16 ते 20 टक्के, मल्टी स्पेशलिस्ट व्यवस्थापनाची सोय असणारी सर्व रुग्णालये कोविड रुग्णांसाठी कार्यान्वित करावीत.
  • 20 टक्क्यांहून जास्त, कोविडसाठी यापूर्वी निवडण्यात आलेली सर्व संवर्गातील 1 ते 3 रुग्णालये कार्यान्वित करावीत.

औषधे साधनसामग्री आणि ऑक्सिजन पुरवठा-  प्रत्येक जिल्ह्याने आणि महानगरपालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविडचा प्रादूर्भाव ज्या कालावधीमध्ये सर्वाधिक होता, त्यावेळी लागणारी औषधे आणि साधनसामुग्रीची गरज लक्षात घेऊन त्याच्या किमान 50 टक्के औषधे नेहमी उपलब्ध असतील, याची दक्षता प्रत्येक रुग्णालय स्तरावर तसेच जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर घेणे आवश्यक आहे. तसेच पुढील पंधरा दिवसांचा औषध व साधनसामुग्री स्टॉक हा बफर स्टॉक म्हणून उपलब्ध ठेवण्याची ही खबरदारी घेण्यात यावी.

प्रत्येक जिल्हा/मनपाने त्यांना लागणाऱ्या दैनंदिन ऑक्सिजनचे शिस्तशीर संनियंत्रण करावे.  कोणत्याही कारणाने ऑक्सिजन पुरवठा अपुरा पडणार नाही, याची खातरजमा करावी. गरजेनुसार महानगरपालिका दवाखाने आणि काही खाजगी छोटया क्लिनिक/ रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रे उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे.  ऑक्सिजन टँकसाठी सुरु असलेली कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करुन यंत्रणा कार्यान्वित करावी.

गंभीर रुग्णांना संदर्भ सेवा- जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात गंभीर रुग्णांना संदर्भ सेवा देण्यासाठी यंत्रणा सुसज्ज असणे आवश्यक आहे.  रुग्णवाहिका सर्व आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण असतील, याची काळजी घेण्यात यावी. रुग्णवाहिका सुविधांबद्दलची माहिती सर्वसामान्य जनतेला विविध माध्यमातून मिळणे आवश्यक आहे.

अतिजोखमीच्या व्यक्तींची जपणूक आणि को-मॉर्बिडीटी क्लिनिक- ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि ज्यांना अतिजोखमीचे आजार (Co-morbidities) आहेत, अशा व्यक्तींनी अनलॉकनंतरही आपला जनसंपर्क आवश्यक तेवढा आणि मर्यादित ठेवण्याची आवश्यकता आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर अतिजोखमीच्या आजारावर योग्य व नियमित उपचार आणि ते नियंत्रित ठेवण्याबाबत या समूहाला मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. यासाठी को-मॉर्बिडिटी क्लिनिक सुरु करणे महत्वाचे ठरेल.  तसेच ' माझे कुटुंब, माझी जबाबदारी,' या मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याने आणि महानगरपालिकेने अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण केलेले आहे.  या व्यक्तींची यादी उपकेंद्र आणि वॉर्ड स्तरावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना देऊन त्यांची साप्ताहिक तपासणी करण्यात यावी.

 क्षेत्रीय पातळीवर टीमची स्थापना- कोविड प्रतिबंध आणि नियंत्रणासंदर्भात क्षेत्रिय पातळीवरील विविध महत्वाच्या कार्यवाही साठी क्षेत्रिय पातळीवर उपकेंद्र , वॉर्ड निहाय पथके कार्यरत असणे आवश्यक आहे. ही पथके खालील महत्वपूर्ण कामे करतील –

Ø  घरगुती विलगीकरणात (Home Isolation )असलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन - एकूण बाधित रुग्णांपैकी मोठया प्रमाणावर रुग्ण हे घरगुती विलगीकरणात असतात. या रुग्णांचे व्यवस्थापन प्रभावीपणे होण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर पथके कार्यरत असणे आवश्यक आहे. या पथकांनी घरगुती विलगीकरणात असलेल्या रुग्णांचे दैनंदिन मॉनिटरींग करणे अपेक्षित आहे. जिल्हा आणि मनपा टास्क फोर्सने हे सूक्ष्म नियोजन करावे.

Ø   निकटसहवासितांचा शोध (Contact Tracing) - सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी यातील प्रत्येकाचे सखोल कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक क्षेत्रिय पथके कार्यरत ठेवणे आवश्यक आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार निकटसहवासितांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात यावी. या दोन्ही पथकांचा समन्वय असणे आवश्यक आहे.

Ø   फ्ल्यू सदृश्य रुग्णांचे सर्वेक्षण- ग्रामीण आणि शहरी भागात हे सर्वेक्षण नियमितपणे होणे आवश्यक आहे. हे सर्वेक्षण करताना कार्यक्षेत्रातील हॉट -स्पॉट, वृध्दाश्रम, इंडस्ट्रिएल क्लस्टर, स्थलांतरित मजूर वस्ती या भागांकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

क्षमता संवर्धन आणि प्रशिक्षण – कोविड सर्वेक्षण, क्लिनिकल मॅनेजमेंट या संदर्भात यापूर्वीच सर्व संबंधितांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तथापि नव्याने समोर येणाऱ्या बाबी, क्लिनिकल प्रोटोकॉलमधील बदल यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकारी , कर्मचारी यांचे पुर्न:प्रशिक्षण आवश्यकतेनुसार घेण्यात यावे.

 

 

 कोविड -अनुरुप वर्तनाचा प्रसार आणि आरोग्य शिक्षण (Covid Appropriate Behaviour)- कोविड आजाराचा प्रसार कमी करण्यासाठी आणि दुसऱ्या लाटेची शक्यता कमी करण्यासाठी आपण व्यक्ती आणि समाज म्हणून कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करणे आवश्यक आहे. या कोविड अनुरुप वर्तनाची माहिती आपण वेगवेगळया माध्यमातून आरोग्य शिक्षण विषयक कार्यक्रमातून समाजामध्ये करणे आवश्यक आहे.

फटाकेमुक्त दिवाळी - ही दिवाळी फटाके विरहित दिवाळी म्हणून साजरी करणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या धूरामुळे कोविड रुग्णांचा, श्वसनास त्रास असणाऱ्या व्यक्तींचा त्रास आणखी वाढू शकतो. याशिवाय कोविड अनुरुप वर्तनासंदर्भात लोक प्रबोधन करताना पुढील मुद्यांवर भर देणे आवश्यक आहे –

v  गर्दीच्या ठिकाणी किंवा समूहात असताना मास्कचा वापर अनिवार्य,

v  हातांची स्वच्छता,

v  नेहमी स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची नियमित स्वच्छता,

v  दोन व्यक्तींमध्ये शारिरिक अंतर राखणे,

v  भारतीय पध्दतीने अभिवादन करणे,

v  श्वसनसंस्थेचे शिष्टाचार,

v  सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान आणि थुंकणे टाळणे,

v  अनावश्यक प्रवास टाळणे,

v  कोविड रुग्ण, त्यांचे कुटुंबिय यांच्याशी सामाजिक भेदभाव टाळणे,

v  समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर, अफवा, चुकीचे मेसेज फॉरवर्ड करु नयेत,

v  अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती घ्यावी,

v  मानसिक ताणतणाव टाळण्याकरिता मित्र, नातेवाईकांशी बोलावे. आवश्यक तेव्हा तज्ञांचा सल्ला घ्यावा.

कोविडच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या कार्यक्षेत्रात आपले वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक वर्तन अत्यंत जबाबदारीने योग्यप्रकारे ठेवणे, ही येणाऱ्या काळाची गरज आहे.  तेव्हा सर्वांनीच आनंदाने शासकीय नियमांचे पालन करु अन् उत्साहाने दिवाळी साजरी करु..! दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा..!

 

   मनोज शिवाजी सानप

  जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

००००००

 

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक