आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित असणाऱ्या जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी अनोखी भेट

 


अलिबाग,जि.रायगड,दि.05 (जिमाका) : जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या ज्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे, अशा जिल्ह्यातील एकूण 119 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना हा लाभ देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या पुढाकारातून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली व दि.4 नोव्हेंबर 2020 रोजी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे  प्रलंबित लाभ मंजूर करण्यात आले. यामध्ये जे कर्मचारी दि.01 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त, मयत झालेले आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबालादेखील याचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शासकीय सेवेत पदोन्नतीची संधी उपलब्ध न झाल्याने ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना एकाच पदावर 10, 20 व 30 वर्षे किंवा 12 व 24 वर्षे झालेली आहेत, अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासनाने आश्वासित प्रगती योजना व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केलेली आहे. परंतु जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी जवळ जवळ 6 ते 7 वर्षे किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधीपासून या लाभापासून वंचित राहिले होते. हे लक्षात आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहान माने यांनी या योजनेचा लाभ संबंधितांना मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही सुरु केली.

हे कामकाज करण्यासाठी अतिरिक्त वेळेची व अधिक श्रमाची आवश्यकता होती. त्यामुळे आपल्याच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना हा लाभ देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक सुरेश शिंपी, प्रशासकीय अधिकारी पी.डी.धामोडा, वरिष्ठ लिपिक उमेश कदम, कनिष्ठ लिपिक निशांत घासे यांनी कार्यालयीन वेळेत तसेच प्रसंगी सुट्टीच्या दिवशीही येऊन नेटाने युध्दपातळीवर काम केले.  यासाठी त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहान माने यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. या सांघिक प्रयत्नांमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय व त्यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त विशेष भेट मिळाल्याचाच आनंद झाला आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक