कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी कोकणवासियांच्या मदतीला तत्परतेने धावून येणार राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक पथक महाड येथे कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यासाठी शासनाने पाठविला केंद्र शासनाला प्रस्ताव पालकमंत्री आदिती तटकरे यांचा पाठपुरावा

 वृत्त क्रमांक:- 1337                                                               दिनांक :- 05 नोव्हेंबर 2020


अलिबाग,जि.रायगड,दि.05 (जिमाका) :- नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे.  निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी तसेच नुकत्याच घडलेल्या महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व निर्मूलनासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथकाचा कायम स्वरुपी बेस कॅम्प जिल्ह्यात स्थापित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा आपत्ती प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाचे काम जलदगतीने व्हावे तसेच आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी, म्हणून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्य आपत्ती व्यवस्थापन  विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथक कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला होता व संबंधितांना तसे आदेश देण्यात आले होते. 

          तसेच महाड येथे कायमस्वरूपी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच भूकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन तसेच पत्राद्वारेही विनंती केली होती, त्यातील पहिला टप्पा म्हणजे हे पथक कार्यरत ठेवण्यासाठी, राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथकाचे केंद्र स्थापित  करण्यासाठी जागा निवडून अंतिम करणे व केंद्र शासनाच्या मंजूरीसाठी प्रस्ताव पाठविणे. त्यानुसार आता याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरु झाली असून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनास सविस्तर प्रस्ताव सादर केला व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून संचालक, अभय यावलकर यांच्या सहीनिशी महासंचालक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, नवी दिल्ली यांना अंतिम मंजूरीकरिता पाठविण्यात आला आहे. लवकरच रायगड जिल्ह्यासाठी महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथक कार्यरत ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल. जिल्हाधिकाऱ्यांकडून महाड येथील प्रस्तावित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या केंद्राकरिता  2.57.46 हेक्टर आर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे.

            महाराष्ट्र राज्य सागरी किनारपट्टीने नटलेले राज्य आहे. किनारपट्टीच्या या भागात वार्षिक पर्जन्यमान सरासरी 3 हजार 500 मि.मी.पेक्षाही जास्त आहे. तर रायगड जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान सरासरी 3 हजार 142 मि.मी. असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात 1 हजार 500 औद्योगिक प्रकल्प असून तब्बल 60 प्रकल्प हे अपघाताची भीती असणारे आहेत. मागील 10 वर्षात रायगड जिल्ह्याने 13 आपत्ती अनुभवल्या आहेत. आणि त्यातील बहुतांश घटनांमध्ये आपत्ती निवारणासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने मदत केली आहे. यातील निदर्शनास आलेली बाब म्हणजे आपत्ती प्रसंगी या पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी  आठ तासांपेक्षाही जास्त वेळ लागला, आपत्तीनंतर तात्काळ मदतकार्यासाठी सुरुवातीचा जो अत्यंत महत्वाचा कालावधी असतो तोच कालावधी वेळेवर पोहोचता न आल्याने वाया जातो आणि त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळते. सद्य:स्थितीत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची विभागीय प्रतिसाद केंद्र महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर शहरात आहेत. अशाच प्रकारचे आपत्ती प्रतिसाद केंद्र रायगडमध्येही असणे, ही केवळ रायगड जिल्ह्यापुरतीची गरज नसून याचा उपयोग शेजारील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा या भागात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास तेथेही निश्चितच होईल. 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक