नियमांचे पालन करीत दिवाळी साजरी करुया शासनाने दिवाळीसाठी जाहीर केली विशेष नियमावली

 

वृत्त क्रमांक:- 1338                                                               दिनांक:- 06 नोव्हेंबर 2020


 

अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका) :- राज्यात प्रमुख शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या आठ महिन्यांमध्ये आलेले सर्वच सण व उत्सव साधेपणाने, एकत्रित न जमता साजरे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे यंदा प्रकाशाचा दीपोत्सव अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साधेपणाने व नियम पाळून साजरा करावा, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेणेकरुन करोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही.

दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. करोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे, त्याचा त्रास होऊ शकतो. ऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा.

दिवाळी दरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उत्सव वा कार्यक्रम (उदा. दिवाळी पहाट) आयोजित करण्यात येऊ नयेत. असा कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक अशा माध्यमांतून करावा.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे करोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.

कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक राहणार आहे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, असेही आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक