दि.31 जानेवारी पर्यंत अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करुन घ्या

 

अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- रायगड जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना व इतर योजनांमध्ये अनधिकृत नळ कनेक्शनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. बऱ्याच ठिकाणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अथवा त्यासाठीची अनामत रक्कम व पाणीपट्टी न भरताच अनधिकृतरित्या नळ कनेक्शन घेऊन त्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या लाभधारकांनी असे अनधिकृत नळ कनेक्शन घेतले आहेत, त्यांनी ते नळ कनेक्शन लोकवर्गणी व दंडाची रक्कम भरून अधिकृत करून घेण्याची किंवा तसे न केल्यास अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे.

    ज्या ठिकाणी अशी अनधिकृत नळ कनेक्शन घेण्यात आली आहेत, अशी अनधिकृत नळ कनेक्शन रक्कम रु.5000/- लोकवर्गणी मधून अनामत रक्कम आणि दंडाची रक्कम रु.1000/- दि.31 जानेवारी 2021 पर्यंत आपल्या क्षेत्र हद्दीतील उप अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, रायगड जिल्हा परिषद, उपविभाग यांच्या कार्यालयात भरणा करावी व अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. मात्र दि. 21 जानेवारी 2021 पर्यंत लोकवर्गणी रक्कम रु.5000/- व दंडाची रक्कम रु. 1000/- भरून नळ कनेक्शन अधिकृत करून न घेतल्यास अशी अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यात येतील, याबाबतची नोंद घेण्यात यावी,असे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक