ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणारा निवडणूक कार्यक्रम व टप्पे जाहीर जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88

 


अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका) :- मार्च 2020 दरम्यान कोविड-19 या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्याने मार्च 2020 मध्ये होणाऱ्या सुमारे 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका (एप्रिल 2020 ते जून 2020 मध्ये मुदत संपलेल्या) आयोगाच्या दि. 17 मार्च 2020 च्या आदेशान्वये स्थगित करण्यात आल्या होत्या.  या निवडणुकांचा मतदारयादी कार्यक्रम व निवडणूक कार्यक्रम आयोगाच्या दि. 19 नोव्हेंबर 2020 च्या आदेशान्वये रद्द करण्यात आला आहे. आता आयोगाच्या दि.20 नोव्हेंबर 2020 च्या आदेशान्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर दि. 17 डिसेंबर 2020 पर्यंत त्यावर हरकतीही घेण्यात आल्या आहेत. दि. 9 डिसेंबर 2020 च्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी दि. 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  

या निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी आयोगाच्या दि. 29 नोव्हेंबर 2019 च्या आदेशान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक तीन मधील कलम 10 पोट कलम 4 मधील अधिकारांचा वापर करून एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रम पुढीलप्रमाणे आदेशित करण्यात आला आहे.  रायगड जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे.

  माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम व टप्पे पुढीलप्रमाणे-

तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक:- मंगळवार, दिनांक 15 डिसेंबर 2020, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ:- बुधवार, दि.23 डिसेंबर 2020 ते बुधवार दि.30 डिसेंबर 2020, वेळ:- सकाळी 11.00 ते दुपारी 3.00  (दिनांक 25,26 व 27 डिसेंबर 2020 ची सार्वजनिक सुट्टी वगळून), नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ:- सोमवार, दि.4 जानेवारी 2021 दुपारी 3.00 वाजेपर्यंत,  निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ:- सोमवार, दि.4 जानेवारी 2021 दुपारी 3.00 वाजेनंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक:-  शुक्रवार, दि.15 जानेवारी 2021, वेळ:- सकाळी7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक, मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने (तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) :- सोमवार, दि.18 जानेवारी 2021, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक :-  गुरुवार, दि. 21 जानेवारी 2021 पर्यंत.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड