जिल्ह्यातील जनतेला क्रीडाविषयक सुविधा देण्याविषयीची कामे जलदगतीने पूर्ण करावीत पालकमंत्री आदिती तटकरेंचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.1 (जिमाका):- येथील जिल्हा क्रीडा संकुलातील सोयीसुविधांची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी नुकतीच (दि.30 नोव्हें.) पाहणी केली. या पाहणी दरम्यान  त्यांनी खेळाडूंना व  जनतेला आवश्यक असलेल्या क्रीडाविषयक देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. याशिवाय क्रीडा संकुलातील बहुउद्देशीय सभागृह व वसतिगृहाची दुरूस्ती, संरक्षक भिंतीचे अंदाजपत्रक तयार करून मंजूरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे, जिल्ह्यातील मल्लखांब आखाडे, जिल्हा व राज्यस्तरावरील कुस्तीच्या स्पर्धांसाठी आवश्यक निकषांप्रमाणे कुस्तीपटूंसाठी मातीचा आखाडा तयार करणे, त्याचप्रमाणे नव्याने 400 मीटर लांबीचा सिन्थेटीक ट्रॅक तयार करणे, शूटिंग रेंज उभारणे, श्रीवर्धन, म्हसळा, सुधागड या तालुक्यांसाठी तालुका क्रीडा संकुल उभारणी करण्याच्या कामकाजाबद्दलचा आणि माणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या विभागीय क्रीडा संकुल कामकाजाचा आढावा घेतला. याबरोबरच रेवस बंदराकडे जाणाऱ्या परिवहन विभागाच्या एसटी बसेस या जिल्हा क्रीडा संकुल मार्गे नेण्यासाठी अलिबाग बस आगारास तसे विनंती पत्र देण्यात यावे, अशा सूचना देवून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना ही कामे जलद गतीने पूर्ण करून जनतेला व खेळाडूंना क्रीडाविषयक साेयीसुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याविषयी निर्देश दिले.

      याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.संजय महाडीक, कार्यकारी अभियंता राहुल मोरे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसिलदार सचिन शेजाळ यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक