सीमेवर लढणाऱ्या जवानांचे स्मरण करुन उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त ध्वजनिधी संकलन करावे ---जिल्हाधिकारी निधी चौधरी
सीमेवर लढणाऱ्या जवानांचे स्मरण करुन उत्स्फूर्तपणे
जास्तीत जास्त ध्वजनिधी संकलन करावे
---जिल्हाधिकारी
निधी चौधरी
अलिबाग,जि.रायगड
दि.07 (जिमाका) :- सीमेवर लढणाऱ्या ज्या
जवानांमुळे आपण येथे सुरक्षित आहोत, त्या जवानांचे स्मरण करुन सर्वांनी
उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त ध्व्जदिन निधी संकलन करावे, असे
आवाहन
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी
कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित सशस्त्र
सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ व विजय दिवस कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाची
सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा
सैनिक अधिकारी मेजर सुभाष सासणे,जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या सौ.
कल्पना काकडे, माध्यमिक विभागाचे संजय पाटील, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे वैभव
विचारे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे प्रवीण पाटील, माजी सैनिक,शिक्षक, माजी
सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी श्री.नाठाळकर, श्री.पाटील, श्री.कुंभार,श्री.शाम
जोगळेकर, शुभांगी जोगळेकर, प्रशांत झाडेकर, शंकर काटे, मयांक देसाई, प्रकाश करंबत,
संतोष तावडे, राजेंद्र म्हात्रे, अजित कदम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
निधी चौधरी पुढे म्हणाल्या, भारतीयांच्या जीवनात सेना ध्वजदिन महत्वाचा मानला गेला
आहे.
सन
1949 पासून हा दिवस साजरा केला जातो.
कोविडमुळे काही निर्बंध आले आहेत मात्र येत्या वर्षात आपण सर्व मिळून ध्वजदिन निधी
संकलनाचे उद्दिष्ट्य नक्कीच पूर्ण करु. विशेष म्हणजे निसर्ग चक्रीवादळात एनडीआरएफच्या
टीमने उत्कृष्ट काम केले. त्यातील सदस्य सेनादलातील जवानही असतात. त्यांच्यामुळे इतक्या मोठ्या
आपत्तीमध्ये आपले संरक्षण झाले. सैन्यात लढत असताना वीरगती प्राप्त झालेल्या
जवानांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी, जखमी झालेल्या जवानांच्या वैद्यकीय
सोईसुविधांसाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हा
निधी वापरला जातो. त्यामुळे आपल्या सैन्यदलातील जवानांच्या त्यागाची व शौर्याची
जाणीव ठेवून आपण ध्वजदिनासाठी जास्तीत जास्त निधी संकलित करणे तसेच जिल्हा
प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या
आजी-माजी सैनिक वा त्यांच्या कुटुंबियांना तत्परतेने मदत करणे, ही देखील आपली
सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. या
जवानांच्या प्रति आपण सर्वांनी नेहमीच कृतज्ञ राहायला हवे.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या वेळी जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी उपस्थितांना सांगितले की, सैनिकांच्या
कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात 7 डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून पाळण्यात
येतो व त्या निमित्ताने 7 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेर पर्यंत निधी
गोळा केला जातो.भारताच्या संरक्षणासाठी जे जवान शहीद झाले, जखमी झाले,अपंग
झाले, अशा जवानांच्या कुटुंबियांच्या
जीवनातील अडी-अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे यासाठी जवानांच्या
पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वजदिन निधीचा विनियोग केला
जातो.
स्वातंत्र्यपूर्व
काळात (पॉपी डे) म्हणून ओळखला जात असलेला सशस्त्र सेना ध्वजदिन दरवर्षी 7 डिसेंबर
रोजी संपूर्ण देशभर साजरा करण्यात येतो. ज्यांनी आपल्या जीवनातील अनेक बहुमोल वर्ष
मातृभूमीच्या सेवेत घालविली व आपल्या मातृभमीची सेवा करत असताना ज्यांनी स्वखुशीने
मातृभूमीच्या संरक्षणासाठी प्राण अर्पण केले त्यांना मानवंदना देऊन सैनिकांचे
मनोबल वाढावे, म्हणून हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवसास सशस्त्र सेना
ध्वजदिन म्हणून संबोधण्यात येते.
मेजर सासणे
यांनी ध्वजदिन संकलन व निधी विनियोगाबाबत माहिती देताना सांगितले की,रायगड जिल्ह्यासाठी
ध्वजदिन निधी 2019 करिता 61 लाख रुपये इतके उद्दिष्ट्य देण्यात आले होते त्यापैकी कोविड-19 च्या पार्श्वभूमीमुळे आतापर्यंत एकूण 57 टक्के उद्दिष्ट्य साध्य होऊ
शकले आहे. जिल्हयातील 3 माजी सैनिक व 120 युद्ध विधवा असे एकूण 123 लाभार्थीना
दरमहा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, रायगड मार्फत अनुदान वाटप
करण्यात येते. सन 2020-21 या वित्तीय वर्षात दि.10 एप्रिल 2020 ते 30 नोव्हेंबर 2020
पर्यंत रूपये 1 कोटी 2 लाख सत्याएैंशी हजार इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे.
शेवटी ध्वजदिन
निधीस दिलेली देणगी ही आयकर कायदा 1961 मधील कलम 80 जी (5) (6) अन्वये 100 टक्के
करमुक्त असून सर्वांनी ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करावी व आपल्या देशाच्या
पराक्रमी जवानांच्या कुटुंबियांना स्मरणात राहील,असे सहकार्य करावे, असे
आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर
सुभाष सासने यांनी उपस्थितांना केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.किरण करंदीकर
यांनी केले.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन
निधीसाठी उत्स्फूर्तपणे भरीव सहकार्य करणाऱ्या पेण येथील निवृत्त शिक्षिका
सुलभाताई अनंत लोंढे- जोशी यांनी यावेळीही स्वतःच्या निवृत्ती वेतनातून रुपये 1
लक्ष निधी ध्वजदिन निधी म्हणून मेजर सुभाष सासणे यांच्याकडे सुपूर्द केला.
000
Comments
Post a Comment