नियोजित राज्य संग्रहालयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

 


अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका): महाराष्ट्र राज्याचा अश्मयुगीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचा सांस्कृतिक, ऐतिहासीक व भौगोलिक असा वैभवशाली प्रवास दर्शविणारे राज्य संग्रहालय हे मुंबई महानगर क्षेत्राजवळ रायगड जिल्ह्यात होण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली.

            यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, अपर मुख्य सचिव नियोजन देबाशीष चक्रबर्ती, प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य सौरभ विजय, प्रधान सचिव वित्त श्री. देवरा, जिल्हाधिकारी रायगड श्रीमती निधी चौधरी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) व संचालक पुरातत्व विभाग श्री. गर्गे या बैठकीसाठी उपस्थित होते.

            नियोजित राज्य वस्तूसंग्रहालयाचे महत्त्व, माहिती व संकल्पना मांडणारे सादरीकरण यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार व उपस्थितांसमोर करण्यात आले. तसेच या वस्तूसंग्रहालयाची संकल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित करणे, विचार मंथन करणे, सुयोग्य जागेची निवड, प्रशासकीय तसेच वित्तीय बाबींबाबत धोरणात्मक निर्णय घेणे अशा विविध बाबींसाठी या विषयातील तज्ज्ञांची अभ्यास गट समिती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत गठीत करण्यात आली.

            राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील ‘अलिबाग’ हे ठिकाण या वस्तूसंग्रहालयासाठी अनुकूल असल्याबाबत मत मांडले. त्यास सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व अभ्यासगट समितीने दिलेल्या सर्वकष अहवालानुसार याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर केला जाईल,असे यावेळी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड