शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय व महामंडळाची लाभार्थी निवड समिती बैठक संपन्न

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग (इ.मा.व.) प्रवर्गातील होतकरू व बेरोजगार व्यक्तींना व्यवसाय, स्वयंरोजगार करण्याकरिता अल्प व्याज दराने विविध योजनेंतर्गत कर्ज देण्यात येते. जिल्हा कार्यालय रायगडच्या कर्ज प्रस्तावातील लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा लाभार्थी निवड समितीची बैठक ( गुरुवार दि.10 डिसेंबर) रोजी संपन्न झाली.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था रायगड, जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड, रायगड आदि बैठकीस उपस्थित होते

या बैठकीमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या 14 प्रस्तावांना समितीने मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील होतकरू व बेरोजगार हिमावर प्रवर्गातील व्यक्तींना व्यवसाय स्वयंरोजगार याकरिता मंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बैठकीत दिले.

 शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गियांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. त्या पुढीलप्रमाणे- रुपये 1 लक्ष थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज नाही), 20 टक्के बीज भांडवल योजना. ऑनलाइन वेब पोर्टल द्वारे- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रुपये 10 लक्ष पर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रुपये 10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंत)

थेट कर्ज योजना व 20 टक्के बीज भांडवल योजना या योजनेचे अर्ज जिल्हा कार्यालयात स:शुल्क उपलब्ध आहेत.

ऑनलाईन वेब पोर्टलद्वारे योजनांकरिता महामंडळाच्या  www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार अर्जदारास संगणीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of Intent) दिले जाईल. अर्जदारास याआधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये बँकेने रुपये 10 लाखापर्यंतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. अशा प्रकारे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीस महामंडळामार्फत व्याज परत मिळते.

सन 2020-21 करिता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा यासाठी 140 तर गट कर्ज व्याज परतावा योजनेकरिता 25 लाभार्थी इतके भौतिक उद्दिष्टय आहे. अर्जदारास या योजनांचा लाभ घेण्यास संकेतस्थळावर दाखल (अपलोड) करण्यास आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे- पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रिकेची प्रत, उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा रुपये 8 लक्ष पर्यंत), तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी दिलेला, सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचे प्रमाणपत्र (इ.मा.व.) व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र (स्थानिक स्वराज्य संस्थेचे- ग्रामपंचायत/नगरपालिका), वय, अधिवास व राष्ट्रीयत्व (डोमिसाईल) दाखला, रहिवासाचा पुरावा, आधारकार्ड संलग्न केलेल्या बँक पासबुकची प्रत, जन्मतारखेचा दाखला इत्यादी.

इच्छुक, गरजू इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेच्या अधिक माहितीकरिता शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लिमिटेडचे जिल्हा कार्यालय, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था, मर्यादित, सदनिका क्रमांक 101, पहिला मजला, चेंढरे, अलिबाग (दूरध्वनी क्रमांक 02141-224448) वा ई-मेल dmobcalibagraigad@gmail.com येथे संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळांना भेट द्यावी,  असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.नार्वेकर यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड