अलिबाग येथे नवस्थापित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदनिर्मितीबाबत मंत्रालयात बैठक संपन्न

 


अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका) :  राज्य शासनाच्या मान्यतेनुसार अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करुन या महाविद्यालयाच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने येत्या वर्षात म्हणजेच सन-2021 मध्ये वैद्यकीय शिक्षणसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा प्राप्त होण्याच्या दृष्टीने राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक संपन्न झाली.

            या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, खासदार श्री. सुनील तटकरे, अपर मुख्य सचिव नियोजन देबाशीष चक्रबर्ती, प्रधान सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये सौरभ विजय, जिल्हाधिकारी रायगड श्रीमती निधी चौधरी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) व संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन श्री. तात्याराव लहाने उपस्थित होते.

            यावेळी पालकमंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मौजे उसर येथील सुमारे 42 एकर शासकीय जमीन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळाची जमीन प्रदान करण्यात आली आहे. तसेच या महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महाविद्यालयाचे प्रशाकीय इमारतीसाठी अंदाजपत्रके व आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यास राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता नजिकच्या कालावधीत अपेक्षित आहे.

            या दरम्यानच्या कालावधीत रायगड तसेच कोकण परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने केंद्रीय रसायन व खते यांच्या अखत्यारीतील अलिबाग येथील राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टिलायझर कंपनीच्या विनावापरात असलेल्या निवासी इमारती, करमणूक सभागृह, जिल्हा शल्य चिकित्सालय व तेथील उपलब्ध इमारती, प्रशिक्षण केंद्राची इमारतीच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्पुरत्या स्वरुपात सुरू करण्याचे नियोजित आहे. त्यानुषंगाने आवश्यक पदनिर्मिती व अनुषंगिक बाबींसाठी शासन स्तरावर वित्तीय व प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत कार्यवाही व्हावी, असे यावेळी खासदार श्री. तटकरे  म्हणाले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड