जिल्ह्यात “माझी कन्या भाग्यश्री” योजनेची प्रभावी अंमलबजावणी 208 लाभार्थीं मुलींच्या खात्यात 52 लाख रुपयांचे अनुदान वर्ग

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):- राज्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास सेवा योजनेनुसार माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार एका मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या माता पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या खात्यात 50 हजार रुपये आणि दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या खात्यात प्रत्येकी 25 हजारांचे अनुदान वर्ग केले जात आहेत. रायगड जिल्ह्यात या योजनेची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत 208 लाभार्थीं मुलींच्या खात्यात 52 लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली आहे.

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे या प्रमुख हेतूने माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजना 2016-17 मध्ये राबविण्यास राज्यात सुरुवात करण्यात आली. त्यानुसार रायगड जिल्ह्यात आत्तापर्यंत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने 208 लाभार्थी मुलींना अनुदान वाटप करण्यात आले आहे, तर आणखी 40 प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त असून त्यांच्यावर कार्यवाही सुरू असून या योजनेंतर्गत अनुदान मिळण्यासाठी पात्र कुटुंबांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही श्री. मंडलिक यांनी केले आहे.

योजनेच्या अटी व नियम

 पहिले अपत्य मुलगा आणि नंतर मुलगी किंवा पहिले अपत्य मुलगी आणि नंतर मुलगा झाल्यास लाभ घेता येणार नाही,  लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे, लाभ घेण्यासाठी मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्या तर त्या योजनेस पात्र असतील, विहीत मुदतीपूर्वी मुलीचा विवाह झाल्यास किंवा दहावीपूर्वी तिने शाळा सोडल्यास, नापास झाल्यास या योजनेचा फायदा मिळणार नाही, मुलीचा नैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्यास मुलीच्या नावे गुंतविण्यात आलेली रक्कम तिच्या पालकांना मिळेल,  प्रत्येक लाभार्थी मुलीसाठी स्वतंत्र खाते बॅंकेत उघडण्यात येणार आहे, स्थानिक तहसिलदाराकडून उत्पन्नाचा दाखल मिळणे आवश्यक आहे, पात्र कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाखांपेक्षा कमी असावे.

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे तसेच इतर उद्दिष्टाने परिपूर्ण अशी माझी कन्या भाग्यश्री ही योजना आहे. एक किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर माता पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलींच्या खात्यात अनुदान जमा केले जात आहे. रायगड जिल्हा परिषदेकडून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. आत्तापर्यंत या योजनेंतर्गत 52 लाख रुपयांचे अनुदान मुलींच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक