“कोविशील्ड” लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ संपन्न

 



अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :- केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आज जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे कोविशील्ड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

             यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, आरसीएफ चे अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

            प्रारंभी कोविशील्ड लसीकरण केंद्राचे  पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचण्यात येवून कोविशील्ड लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.

              जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी 1 आणि पनवेल येथील 2 अशा 4 केंद्राच्या माध्यमातून आरोग्य  कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील कोविशील्ड लसीकरण मोहिमेसाठी 9 हजार 500 लसी प्राप्त झाल्या आहेत.  पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर त्याच व्यक्तीला दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी सिरम इन्स्टिटयूटने तयार केलेली कोव्हीशिल्ड लस तसेच भारत बायोटेक या उत्पादकाने तयार केलेली कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. राज्याला कोविशील्ड व्हॅक्सिनचे 9 लाख 63 हजार डोसेस व कोव्हॅक्सिन लसीचे 20 हजार डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.  भारत बायोटेक कडून प्राप्त झालेली कोव्हॅक्सिन लस ही राज्यातील 6 ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालये व 2 जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.

       केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय व खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. या लसीचे 2 डोस 4 आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत,प्रत्येक लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी शीतसाखळी अबाधित ठेवून लस, लसीकरणासाठी आवश्यक सामुग्री, AD Syringes तसेच AEFI Kit उपलब्ध आहेत. तसेच सर्व संबंधीत कर्मचा-यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड