नियमांचे पालन केल्यास अपघात रोखता येतील रस्ते सुरक्षा अभियान उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे प्रतिपादन

 



अलिबाग,जि.रायगड, दि.18 (जिमाका)  :- अपघातामुळे 15 ते 25 वयोगटातील 30 टक्के वाहन चालकांचा मृत्यू होतो, ही मोठी गंभीर बाब आहे. जिल्हयामध्ये 35 टक्के अपघात रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. अपघात रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक असून नियमांचे पालन केल्यास अपघात रोखता येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज येथे व्यक्त केले. 

            पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रायगड जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते व जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

            यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, सार्वजिनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे आदी मान्यवरांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी, विद्यार्थी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी निधी चौधरी पुढे म्हणाल्या, रस्ता सुरक्षेचे महत्व जनतेला पटले पाहिजे, या दृष्टीने प्रत्येकाने रस्ता सुरक्षेसाठी पावले उचलणे गरजेचे आहे. रस्त्यांवरील होणाऱ्या अपघाताबाबत संवेदनशीलता व जागृती कमी दिसते. 90 टक्के लोकांना रस्ता सुरक्षेची माहिती नाही, ही मोठी शोकांतिका आहे. अतिवेगाने वाहन चालविल्याबरोबरच ओव्हरटेक करण्याच्या घाईमुळेही 7 टक्के अपघात होतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालविण्याबाबत भान असणे आवश्यक आहे. रस्त्यांवरील अपघात व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी चालकांनी रस्ता सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या बाजूला असलेल्या वेगवेगळ्या मोठ्या फलकांमुळे अपघात होतात. सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस या विभागांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

खबरदारी घेतल्यास अपघात रोखता येणार

देशामध्ये एक लाखापेक्षा अधिक जणांचा अपघातामुळे मृत्यू झाला आहे. वाहन वेग मर्यादा, लेन कटींग, नो एंट्री सारख्या नियमांचे पालन करून वाहन चालविल्यास अपघात रोखता येणार आहेत. 50 टक्के अपघात हे स्वतःच्या निष्काळजीपणामुळे होतात. त्यामुळे नागरिकांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मत पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी याप्रसंगी मांडले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान विषयीच्या माहितीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षा अभियानात उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला देशभर रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. यावर्षी देशभर दि.18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 असे संपूर्ण महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाणार असून "सडक सुरक्षा-जीवन रक्षा" हे यावर्षीचे घोषवाक्य आहे, असे सांगून या कालावधीत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे घटक असलेले सर्व विभाग म्हणजे महसूल व गृह विभाग, परिवहन विभाग, ग्रामीण विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था रस्ता सुरक्षेसंबंधित सर्व घटक म्हणजे सर्व वाहतूक संघटना, वाहन वितरक, सेवाभावी संस्था, विविध उपक्रम राबवून लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयक जनजागृती व रस्ता सुरक्षा नियमांचा प्रसार करणार आहेत. रायगड जिल्ह्याचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्व अबाधित आहे. अनेक गड किल्ले, पर्यटनस्थळे, सागरी किनारे यांनी जिल्हा समृध्द असल्याने आपल्या जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांचे प्रमाणही जास्त आहे. आपल्या जिल्ह्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याने वाहतूक व्यवस्था व सुरक्षित रस्ता वाहतूक आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे.

जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कार्यरत असून समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. 32 वे रस्ता सुरक्षा अभियान हे त्याचाच एक भाग आहे.

2019 ह्या वर्षात मृत्यूचे प्रमाण 31 % ने कमी करुन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. 2020 ह्या वर्षात अपघतांचे प्रमाण 40 % ने कमी झाले तरी मृत्यूच्या संख्येत कमी प्रमाणात म्हणजे 6 % घट झाली आहे, अशी माहिती उपस्थितांना दिली व शेवटी आवाहन केले की, रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून सर्वच विभागांनी उपाययोजना करुन अपघातांच्या संख्येचे व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी केले.

           

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक