अलिबाग नेहरु युवा केंद्र व जिल्हा विधी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन साजरा

 


 

            अलिबाग,जि.रायगड दि.12 (जिमाका) :- स्वामी विवेकानंद यांची जयंती युवकांना प्रेरणा देणारी असते म्हणून 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभर साजरा होतो. युवा दिनाचे व युवा सप्ताहाचे औचित्य साधून अलिबाग नेहरू युवा केंद्र व जिल्हा विधी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने वरसोली मधील कारभारी क्लासेस येथे 65 युवक/युवतींच्या उपस्थितीत स्वामी विवेकानंद यांची जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.

नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी  निशांत रौतेला आणि कारभारी क्लासचे संचालक यांनी कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करून केली. यावेळी काही तरुण व तरुणींना पुष्प देऊन प्रातिनिधिक स्वरुपात राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तरुणांनी शासकीय सेवेत येण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, त्यातून देश सेवा घडू शकते, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे निशांत रौतेला  यांनी उपस्थित युवांना केले. त्याचबरोबर मतदार दिनानिमित्त मतदानाचा आपला हक्क आणि मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहनही केले.

जिल्हा विधी प्राधिकरणातर्फे जेष्ठ लिपिक श्रीमती पुष्पा मगर  व अॅड.गुंजाळ यांनी विधी प्राधिकरण सेवा याबाबतची माहिती सांगून उपस्थितांचे आभार मानले.

 

तरुणांनी देशासाठी योगदान देण्यासाठी सामाजिक सेवेत पुढे यायला हवे, चंगळवाद आणि भोगवाद यापासून दूर राहून देशकार्यासाठी हातभार लावायला हवा, असे प्रतिपादन युवकांशी संवाद साधताना सामाजिक कार्यकर्ता सुशील साईकर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कारभारी क्लासेसचे संचालक श्री.संतोष कारभारी यांनी केले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक