राज्यात बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग नाही पशुसंवर्धन विभागाची माहिती

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :-  राज्यात वन्य, स्थलांतरीत पक्षी अथवा कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही. त्यामुळे कुक्कुटपालक तसेच अंडी आणि मांस खाणाऱ्या नागरिकांनी घाबरण्याची परिस्थिती नाही. परंतु व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालनाच्या ठिकाणी काही बाब आढळून आल्यास त्वरीत पशुवैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

बर्ड फ्लू रोगाचा प्रादूर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ या राज्यांमधील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. हिमाचल प्रदेशामध्ये कांगडा जिल्ह्यातील पॉंग धरणाच्या परिसरात सायबेरिया आणि मंगोलिया देशांमधून स्थलांतरीत झालेल्या बदकांमध्ये हा प्रादूर्भाव आढळून आला आहे. निशाद (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हायसिक्‍युरिटी निमल डिसीजेस, भोपाळ) या राष्ट्रीय संस्थेने बर्ड फ्लु रोगाचा एच5एन1 स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान केले आहे. हिमाचल प्रदेशातील वन विभागांद्वारे पानथळ जमिनीशेजारच्या भागामध्ये या रोगाच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

राजस्थान राज्यातील झालवाड आणि जोधपूर आणि मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील कावळ्यांमध्ये हा प्रादूर्भाव झाला आहे. निशाद संस्थेद्वारे बर्ड फ्लु रोगाचा एच5एन8 स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान करण्यात आले आहे.

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लू सर्व्हेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रव, विष्ठा आणि रक्तजल नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात.

पुण्यातील पश्‍चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात येतात. 2020-21 मध्ये या संस्थेने राज्यातील एकूण एक हजार 715 विष्ठा नमुने, एक हजार 913 रक्तजल नमुने आणि 1549 घशातील द्रव नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केली आहे.

तपासणीअंती सर्व नमुने बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. स्थलांतरीत जंगली पक्षी, कावळ्यांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन करणाऱ्या ठिकाणांवर बर्ड फ्लू रोगाचे सर्वेक्षण अधिक प्रखरपणे राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे देण्यात आली आहे.

तरी महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप  https://play.google.com/store/apps/details? id=com.rtc.krushik&showAllReviews=true  या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड