सर्व मतदार बनू..“सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक” विविध कार्यक्रमांनी “राष्ट्रीय मतदार दिवस” झाला उत्साहात साजरा मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे --- जिल्हाधिकारी निधी चौधरी

 



 

अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका) :-   मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. मतदान करताना आपली सद्सद् विवेक बुध्दी जागृत ठेवून मतदान करुन लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी  यांनी आज येथे केले.

            राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने जिल्हा नियोजन सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो), रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.), सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)  वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसिलदार  सचिन शेजाळ, दिव्यांग आयकॉन साईनाथ पवार, प्रिझम सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी  आदी मान्यवर उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी निधी चौधरी पुढे म्हणाल्या की, भारत निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाचा वापर ज्या नवनवीन सुविधा बनविल्या त्या सुविधांचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करावा.  दिव्यांग व्यक्ती व  वय वर्षे 80 वरील असलेल्या मतदारांसाठी पोस्टल व्यवस्था आणि  इतर अनेक सुविधा देण्याचेही भारत निवडणूक आयोग प्रयत्न करीत आहे.  ज्यामुळे भारतातील एक मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही. भारतातील कारागृहात असलेल्या कैद्यानांही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक प्रयत्न करीत आहे. सन 1952  ते सन 2021 भारतातील मतदारांना सशक्त, सुरक्षित, सतर्क व जागृत बनविण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. ज्यांचे वय 1 जानेवारी 2021 रोजी  18 वर्षे पूर्ण झाले आणि ज्यांनी आपले नाव मतदारयादीत नोंदविले आहे, असे नवीन मतदार येणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. मतदान हा आपल्याला घटनेमुळे मिळालेला विशेष हक्क आहे. त्याबरोबरच मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्यसुध्दा आहे.  नवीन मतदारांनी आपल्या घरातील नागरिकांची नावे मतदारयादीत आहेत किंवा नाहीत हे तपासून घ्यावे. तसेच मतदानाच्या वेळी मतदान करण्यासाठी त्यांना आग्रह करावा, असे सांगून ज्यांचे मतदारयादीत नाव नसेल अशा नागरिकांनी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तसेच तालुक्यातील संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मतदार यादीत आपले नाव नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी उपस्थितांना केले.

            यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते नवीन मतदारयादीत नोंदणी झालेल्या सोनाली जितेंद्र मिश्रा, चेंढरे-अलिबाग, श्रध्दा श्रीकांत थळे, चेंढरे-अलिबाग, भाविका कैलास नवखंडे, अलिबाग, साक्षी जितेंद्र मिश्रा, चेंढरे अलिबाग, संचिता दयाराम जायनाखवा, वरसोली, अलिबाग या नवमतदारांना मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.  तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या पी.एस.भायदे, विकास पांडूरंग पाटील, समीर प्रकाश शेडगे, विष्णू भारत पोसणे, अमोल शांताराम करंदेकर  तसेच उत्कृष्ट डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या संकेत सुकले, रुपेश सदानंद म्हात्रे, सचिन नागोठणेकर, सुनिल काळे, हर्षद राऊत, ममतेश पाटील सुमित कांबळे  यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

            राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदार जनजागृतीसाठी अलिबाग शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली होती. या प्रभातफेरीत विद्यार्थी, नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रिझम संस्था, स्वयंसिध्दा यांनी जनजागृतीसाठी पथनाटय सादर केले. तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती वैशाली माने यांनी उपस्थितांसह राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सामूहिक प्रतिज्ञा वाचन केले.

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार  प्रदर्शन राकेश सावंत यांनी मानले.  कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी  उपस्थित होते.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक