जिल्ह्यात करोना लसीकरणाचा ड्राय रन सुरु झाला हो…!

 



 

अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-  राज्यात कोविड 19 लसीकरण मोहीम लवकरच सुरु होणार आहे. त्या अगोदर लसीकरणाचा ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम म्हणून सर्व शासकीय रुग्णालयांमधून ड्राय रन घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज रायगड जिल्ह्यातही अलिबाग जिल्हा रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड आरोग्य केंद्र या चार ठिकाणी ड्राय रन घेण्यात आला. आज सकाळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन या ड्राय रनची पाहणी केली.

शासनाच्या आदेशानुसार कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या ड्राय रनला आजपासून सुरूवात झाली आहे. संपूर्ण राज्यात फ्रन्टलाइन वर्करसाठी पहिल्या टप्प्यात कोविड-19 लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.  जिल्हा प्रशासनाकडूनही लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून आरोग्य यंत्रणाही परिपूर्ण तयारीत आहे. रायगड जिल्ह्यासाठी 5लाख  लस दाखल होणार असून त्या प्राप्त झाल्याबरोबर जिल्ह्यात त्वरित लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी सांगितले.

त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवई आणि इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आज राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ड्राय रन मोहीम राबविण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये  25 लोकांची नोंदणी करुन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड-19 लसीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून लसीकरण मोहिमेत आरोग्य यंत्रणेला कशा पद्धतीने लस द्यायची आहे, याची माहिती व्हावी यासाठी ही रंगीत तालीम आहे. जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, पेण याठिकाणी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील साडे आठ  हजार लाभार्थ्यांची यादी आरोग्य यंत्रणेने तयार केली आहे. दररोज 100 लाभार्थ्यांना कोविडची लस दिली जाईल. यासाठी आज ड्राय रन होत आहे. आज प्रत्येक केंद्रावर 25 लाभार्थी लस घेणार आहेत. जिल्ह्यात भविष्यात 52 ठिकाणी केंद्र उभारून लसीकरण केले जाणार आहे.

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयाने ड्राय रनची सर्व व्यवस्था केली आहे. लसीकरणासाठी ज्या नागरिकांची नोंदणी झाली आहे. त्यांना मेसेज दिला जाणार आहे. मेसेज आल्यानंतर नागरिकांनी लसीकरण केंद्रामध्ये जातील तिथे त्यांना लस देवून अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयाने ड्राय रनची पूर्ण तयार केली आहे. ज्यावेळी जिल्ह्यात लस येतील, त्यावेळी शासनाच्या निकषाप्रमाणे लस दिली जाणार आहे.

            क्षेत्रीय स्तरावर कोवीन अॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे, करोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी/तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्रायरन घेतला जात आहे.

            या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर 25 लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर कोवीन अॅप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाच्या माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये करण्यात येईल.

या मोहिमेची पूर्वतयारी करताना त्यामध्ये राज्यस्तरावरुन जिल्हयांचे यूजर आयडी तयार करणे, जिल्हास्तरावरुन आरोग्य संस्थेचे व लसीकरण पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम झाले. जिल्हयांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन अॅपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोवीन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप करणे व शितसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी 1 ते 4 आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली. यासंदर्भात शासनाकडून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व संबंधितांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

            करोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करावी. मास्क वापरणे आणि योग्य अंतर (Social Distancing) राखणे या नियमांची अंमलबजावणी करण्याच्याही सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक