जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्ह्यातील उत्तम काम - पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 


अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका) : जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्ह्यात आत्तापर्यंत चांगले काम करण्यात आले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.12) येथे दिली. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत कामांसाठी शासनाकडून रायगड जिल्ह्याला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

  जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा योजनांचा आढावा गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, जल जीवन मिशन संचालक आर. विमला, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत प्रत्येक तालुक्यानुसार जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ कनेक्शन, शाळा, अंगणवाड्यांना जोडण्यात येणाऱ्या नळ कनेक्शनची माहिती घेतली. तसेच जिल्ह्यातील पूर्ण, अपूर्ण, प्रस्तावित नळपाणी पुरवठा योजनांची माहिती घेतली.  

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पाणी पुरवठा विभागाचे उप कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांच्यासह गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली.

  रायगड जिल्ह्याला 2020-21 मध्ये 1लाख 10 हजार 901 कुटुंबांना नळपाणी उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे 1 लाख 19 हजार 187 कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. तर 20 नोव्हेंबरपासून 344 शाळा व 1 हजार 234 अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण गावांपैकी 555 गावांमधील 100 टक्के घरांमध्ये नळ कनेक्शन देण्यात आले असल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

   यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत येणारी रायगड जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांचा दरमहा  विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. 31 मार्च 2021 पर्यंत सर्व योजना पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे, अशा सूचना गुलाबराव पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या. तसेच याबाबत पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

  जल जीवन योजनेंतर्गत उत्तम कार्य केल्याबद्दल रायगड जिल्हा परिषदेला सन्मानपत्र देऊन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांनी सन्मानित केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांनी सन्मानपत्र स्विकारले. तसेच राज्यात 100 टक्के घरांना नळ कनेक्शन देणारा उरण तालुका प्रथम ठरल्याबद्दल सन्मानपत्र देऊन तालुक्याचा गौरव करण्यात आला. गटविकास अधिकारी निलम गाडे, उप अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी हे सन्मानपत्र स्वीकारले.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक