गिधाड प्रकल्पांसाठी चिरगाव वन राखीव म्हणून घोषित पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झाला निर्णय

 


 

 

अलिबाग,जि.रायगड दि.03(जिमाका) :-  गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून महाड येथील सिस्केप या पक्षी संवर्धन व   पर्यावरण क्षेत्रात काम  संस्थेच्या म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथील गिधाड संवर्धन प्रकल्पास आवश्यक असणारे संबंधित त्रेचाळीस हेक्टर वन शासनामार्फत आज राखीव करण्यात आल्याची घोषणा  पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीमध्ये  करण्यात आली.

            गेल्या तेवीस वर्षांपासून सिस्केप संस्थेमार्फत पक्षीसंवर्धन व पर्यावरण क्षेत्रात रायगड जिल्ह्यात  विविध ठिकाणी कार्य सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून म्हसळा तालुक्यातील चिरगाव  या  चव्वेचाळीस हेक्टर वनामध्ये  गिधाड संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विविध सामाजिक संस्था व मान्यवरांच्या मदतीने अविरत सुरू आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने येथील सर्व गिधाडांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान संस्थेसमोर उभे राहिले होते  .

             या निसर्ग चक्रीवादळामध्ये चिरगाव तालुका म्हसळा येथील वन पूर्णपणे नामशेष झाल्याने येथील गिधाडांनी अन्यत्र विहार सुरू केला होता, हे लक्षात घेऊन सिस्केप संस्थेमार्फत रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्याकडे शिरगाव वन राखीव म्हणून घोषित करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून  करण्यात आली होती, या संदर्भात आज पालकमंत्री कु.तटकरे यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये झालेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत संबंधित वन राखीव म्हणून घोषित करण्यात आले.

            या बैठकीस रोहा, ठाणे व श्रीवर्धन येथील वनवृत्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच रोहा वनवृत्त अधिकारी श्री. शेपट, सिस्केप संस्थेचे श्री.प्रेम सागर मेस्त्री, श्री.गणेश खातू  उपस्थित होते.

            या बैठकीत सिस्केप संस्थेमार्फत शिरगाव येथे सुरु असलेल्या गिधाड संवर्धन प्रकल्पाची माहिती चित्रफितीद्वारे उपस्थितांना देण्यात आली व  याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली  .

             गिधाड प्रकल्पाची सध्याच्या परिस्थितीमध्ये असलेली आवश्यकता याबाबत श्री. मेस्त्री यांनी मंत्री महोदयांना व उपस्थित अधिकाऱ्यांना माहिती दिली.  त्यानुसार झालेल्या चर्चेतून हे क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

            आगामी काळात या परिसरामध्ये रोपवाटिका निर्माण करून या ठिकाणी असलेल्या अन्य पक्षांच्या संवर्धनाकरिताही करावयाच्या मोहिमेबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक