नियमित रुग्ण नोंदणीसाठी व क्षयरोग निर्मूलनासाठी जनतेने शासनास सहकार्य करावे

 


अलिबाग, जि.रायगड, दि.26 (जिमाका) : खासगी क्षेत्राकडून वैद्यकीय सेवा घेणाऱ्या क्षयरुग्णांची आरोग्य विभागात नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे निर्देश राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाद्वारे देण्यात आले आहेत. प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद होऊन त्याच्यावर उपचार करणे, क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी उपायोजना करण्याच्या उद्देशाने खाजगी डॉक्टरकडे उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांनी आरोग्य विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 दोन आठवडे व त्यापेक्षा जास्त काळ खोकला व ताप, सतत खोकला व रक्तमिश्रीत बेडका, सायंकाळी येणारा ताप, भूक मंदावणे, शरीराचे वजन कमी होणे, यापैकी कोणतेही एक लक्षण असल्यास अशी व्यक्ती संशयित क्षयरुग्ण समजली जाते.

क्षयरोग निदान व उपचार करणाऱ्या राज्यातील सर्व पॅथॉलॉजी, मायक्रोबॉयलॉजी, प्रयोगशाळा रिव्हर्स रेडिओलॉजी, विविध पॅथॉलॉजी रुग्णालये, डॉक्टर्स तसेच क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांनी आरोग्य विभागाकडे त्यांच्याकडे येणाऱ्या क्षयरुणांची नोंदणी करावी किंवा रुग्णाला नोंदणी करण्यास सांगावे. जे रुग्ण नोंदणी करणार नाहीत, अशा सर्वांना क्षयरोग प्रसारासाठी जबाबदार धरण्यात येऊन भारतीय दंड संहितेच्या कलम 269,270 नुसार कारवाईसाठी पात्र समजले जाईल. दोषींना किमान 6 महिने ते 2 वर्षांपर्यत शिक्षा व दंडाची तरतूद आहे.  त्यामुळे दि.01 जानेवारी 2021 पासून सर्व रुग्णांची नोंदणी राज्य, जिल्हा, मनपा क्षयरोग कार्यालयाकडे करण्याची नोटीस देण्यात आली असून क्षयरुग्णांची माहिती दरमहा जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्याकडे पाठविण्यात यावी, तसेच नियमित रुग्ण नोंदणीसाठी व क्षयरोग निर्मूलनासाठी शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक