अलिबाग शासकीय मूकबधीर विद्यालयास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची भेट मूकबधीर विद्यार्थ्यांना आवश्यक सोई-सुविधांसह चांगले शिक्षण देण्यासाठी इमारतीची उत्तम पुर्नबांधणी करण्याचे संबंधितांना निर्देश

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका) :- रायगड जिल्हा व कोकण विभागातील कर्णबधीर मुलामुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी शासनाने अलिबाग येथे शासकीय मूकबधीर विद्यालय सन 1963 सालापासून सुरु केलेले आहे. या इमारतीस 34 वर्षे कालावधी झाल्यानंतर आता या इमारतीची जीर्णावस्था झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही इमारत सन 2017 मध्ये धोकादायक इमारत म्हणून घोषित केली आहे. यानुषंगाने या इमारतीची पाहणी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शनिवार, दि.06 फेब्रुवारी 2021 रोजी केली.

त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, समाज कल्याण अधिकारी गजानन लेंडी, तहसिलदार सचिन शेजाळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार, शाळेचे अधीक्षक श्री. किशोर वेखंडे तसेच  समाज कल्याण विभागातील अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या इमारतीची सुसज्ज उभारणी होण्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाकडून कमी पडू दिला जाणार नाही.  या इमारतीच्या पुर्नबांधणीसाठी नव्याने अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले असून मूकबधीर विद्यार्थ्यांना आवश्यक सोई-सुविधासह चांगले शिक्षण देण्यासाठी या इमारतीची पुर्नबांधणी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने या इमारतीची आधुनिक पध्दतीची उभारणी करुन दिव्यांगांना अडथळा विरहित संचार व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार, शाळेचे अधीक्षक श्री. किशोर वेखंडे यांनी या शाळेविषयी माहिती देताना या विद्यालयासाठी सुरुवातीला 25 निवासी विद्यार्थी संख्येची मान्यता होती. या संस्थेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सन 1986 मध्ये सुसज्ज इमारत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.  इमारतीच्या उपलब्धतेनंतर संस्थेची प्रवेशित संख्या 25 वरुन 50 इतकी करण्यात आली. ही शाळा शासनाने धोकादायक इमारत घोषित केल्यामुळे सध्या शाळा भाडयाच्या इमारतीत भरविण्यात येत आहे, अशी माहिती उपस्थितांना दिली.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक