जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत आस्थापनेवरील अनुकंपा तत्वावर नियुक्त्यांचा मार्ग खुला-पालकमंत्री कु. आदिती तटकरे

 


अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका)- रायगड जिल्हाधिकारी स्तरावर गट-क व गट-ड मधील पदाच्या प्रतिक्षायादीनुसार नगरपरिषदा/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्याबाबत शासनाने मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे प्रतिक्षायादीनुसार प्रलंबित अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांचा मार्ग खुला झाला आहे.

             जिल्हाधिकारी कार्यालयाकडील प्रतिक्षायादीनुसार अनुकंपा तत्वावरील साधारणत: 27 प्रस्ताव नियुक्तीसाठी प्रलंबित आहेत. संबंधित पात्र उमेदवार व त्यांच्या पालकांनी याबाबत राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानुसार पालकमंत्री कु.आदिती तटकरे या विषयाकडे वैयक्तिक लक्ष देऊन जिल्हाधिकारी कार्यालयास पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत नगरविकास विभागाकडे मार्गदर्शनासाठी पत्रव्यवहार करण्यात आला. 

               नगरविकास विभागाने दि.18 मार्च 2021 रोजी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी संबंधित नगरपरिषद/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे सक्षम नियुक्ती प्राधिकारी आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रतिक्षायादीमधील पात्र उमेदवारांची नावे निश्चित करुन रिक्त पद असलेल्या नगरपरिषद/नगरपंचायतीला कळविल्यानंतर संबंधित मुख्याधिकारी नियुक्तीचे आदेश जारी करतील, अशा सूचना निर्गमित केल्या आहेत.

            यामुळे प्रतिक्षायादीवरील अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवारांस गट-क व गट-ड संवर्गातील पदावर लवकरात लवकर नोकरीत सामावून घेतल्यामुळे  जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतींमधील अपुऱ्या मनुष्यबळाचा व पर्यायाने जनतेची कामे होण्याच्या दृष्टीने येणाऱ्या समस्यांचा प्रश्न सुटेल, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक