"नगरपरिषद क्षेत्रातील यात्रास्थळांच्या विकास कार्यक्रमासाठी सहायक अनुदान" योजनेंतर्गत श्रीवर्धनमधील श्री सोमजाई देवस्थान ट्रस्टला रु.2 कोटी 68 लक्ष निधी वितरणास शासनाची मंजूरी

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.1 (जिमाका):- "नगरपरिषद क्षेत्रातील यात्रास्थळांच्या विकास कार्यक्रमासाठी सहायक अनुदान योजनेंतर्गत राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून श्रीवर्धन नगरपरिषदेला श्री सोमजाई देवस्थान ट्रस्ट या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता एकूण रक्कम रुपये 2 कोटी 68 लक्ष इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजूरी आहे. यामध्ये राज्यशासन, नगर परिषद व देवस्थान असे मिळून मंजूर प्रकल्पाची एकूण रक्कम रुपये 6 कोटी 24 लाख इतकी निश्चित करण्यात आली आहे.

              राज्यशासनाच्या हिस्स्यातील रु.4 कोटी 18 लक्ष रकमेपैकी रुपये 2 कोटी 68 लक्ष निधी वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. मंजूर प्रकल्पाच्या एकूण रुपये 6 कोटी 24 लाख इतक्या रक्कमेपैकी श्रीवर्धन नगर परिषदेचा हिस्सा रु.1 कोटी 03 लक्ष असून श्री सोमजाई देवस्थान ट्रस्टचा हिस्सा रु.1 कोटी 03 लक्ष असणार आहे.

             राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या/यात्रास्थळांच्या ठिकाणी भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. बऱ्याच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी वर्षामधील काही ठराविक कालावधीमध्ये मोठ्या संख्येने यात्रेकरू भेट देतात. अशी तीर्थक्षेत्रे/यात्रास्थळे ज्या स्थानिक नागरी संस्थांच्या क्षेत्रात आहेत त्यांना अशा मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरूंना पुरेशा प्रमाणात नागरी मुलभूत सोई-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने शासनाकडून सहायक अनुदान देण्यात येते. 

             या प्रकल्पांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या कामांना मंजूर रकमेच्या मर्यादेत सक्षम प्राधिकाऱ्यांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची खातरजमा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी करून घ्यावी तसेच या प्रकल्पांतर्गतच्या कामांसाठी कार्यान्वयन यंत्रणा संबधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था राहील, असेही शासनाने सूचित केले आहे.

     या प्राप्त निधीतून श्रीवर्धन नगरपरिषदेच्या हद्दीतील श्री सोमजाई देवस्थान ट्रस्ट या तीर्थक्षेत्राच्या विकासास चालना मिळेल तसेच श्रीवर्धन सारख्या निसर्गरम्य पर्यटनस्थळास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही निश्चितच वाढेल, असा विश्वास राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक