लॉकडाऊन काळात पात्र लाभार्थ्यांना मिळणार मोफत अन्नधान्य तसेच शिवभोजन केंद्रावरून मोफत जेवण

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):-करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावास प्रतिबंध व्हावा, याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये  टाळेबंदी तसेच संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.    

 या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यातर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम,2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंब योजनेच्या सुमारे 7 कोटी लाभार्थ्यांना 1 महिन्याकरीता मोफत अन्नधान्य (गहू व तांदूळ) वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा जिल्ह्यातील सुमारे 17 लक्ष लाभार्थ्यांना  होणार आहे.

  या शासन निर्णयानुसार रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 1 महिन्याकरीता प्रति शिधापत्रिका 35 किलो अन्नधान्य (तांदूळ 25 किलो व गहू 10 किलो) मोफत वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती 05 किलो अन्नधान्य  (तांदूळ 3 किलो व गहू 2 किलो)  1 महिन्याकरीता मोफत वितरण करण्यात येणार आहे.

  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी माहे एप्रिल 2021 चे अन्नधान्य रास्तभाव दुकानातून घेतलेले नसेल त्यांना माहे एप्रिल 2021 मध्येही मोफत अन्नधान्य उचल करता येईल व वरीलप्रमाणे ज्या लाभार्थ्याचे माहे एप्रिल 2021 मधील त्याच्या कोटयाचे अन्नधान्य उचल केले असल्यास त्या लाभार्थ्यांना माहे मे 2021 मध्ये मोफत धान्य घेता येईल.

  पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण करताना शिधापत्रिकेतील किमान एका व्यक्तीचा बायोमेट्रीक पध्दतीने अंगठा ई-पॉस मशिनवर ठेवूनच अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे.(पात्र शिधापत्रिककेतील लाभार्थ्याचे आधारकार्ड प्रमाणीकरण करून)

 जिल्हयात दि.15 एप्रिल 2021 रोजीपासून जिल्हयातील सर्व 88 शिवभोजन केंद्रातून गरीब व गरजू व्यक्तींना मोफत शिवभोजन थाळी वितरण सुरू केले आहे. शिवभोजन थाळी घेताना शिवभोजन ॲपव्दारे लाभार्थ्यांचा फोटो , संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक अपलोड करणे आवश्यक आहे.

   सर्व रास्तभाव दुकानदार व पात्र लाभार्थी यांनी  शासन नियमानुसार अन्नधान्य वितरण/उचल करताना शासनाने ठरवून दिलेल्या मास्क वापरणे, सॅनिटाईजरचा वापर करणे, साबणाने स्वच्छ हात धुणे,  दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी 2 मीटरचे अंतर ठेवणे, या सर्व  करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावयाचे आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड