औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

 


 

अलिबाग,जि.रायगड, दि.29 (जिमाका) :- राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.

 याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्यमंत्री , शंभूराज देसाई, उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालकचे प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालया व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

 राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढ-उताराचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे.  हे निर्देशांक राष्ट्रीय व राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील/राज्यातील औद्योगिक प्रगती मोजण्यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास अत्यंत उपयुक्त आहे.  उद्योग जगतास या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्था यांना नेहमी याची आवश्यकता भासते.  केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली अर्थ व सांख्यिकी संचालनालय व  उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.

 जिल्ह्यामध्ये निवडलेल्या 568 कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती या वेबपोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावर सोपविण्यात आली असून माहितीचे संस्करण करून राज्याचे औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार आहे, असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीमती प्रि.अ.ईश्वरे यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक